जून महिन्याच्या मध्यात जोरदार कोसळल्यानंतर आता रायगड जिल्हय़ात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. तापमानात वाढ कमी झाली नाही तर भात रोप करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यात उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या होत्या. मात्र जून महिन्याच्या मध्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. जवळपास १० दिवसांत जिल्हय़ात सरासरी ८५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास २७ टक्के पाऊस १० दिवसांत पडला. दमदार पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला होता. आता मात्र पावसाने ओढ दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. यामुळे तापमानात बदल झाला असून उष्णतेत काही अंशी वाढ झाली आहे. शेतात पेरणी केलेल्या भाताची रोपे आता तयार झाली आहेत. मात्र, पाऊस गायब होऊन उन्हाचा तडाखा वाढल्याने चार दिवसांत पाऊस पडला नाही तर रोपे सुकून जळण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
दरम्यान सायंकाळी सहाच्या वेळी रिमझिम पावसाने सुरुवात केल्यावर शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले असून कधी एकदा जोरात सुरुवात करतोय त्याची वाट पाहत आहेत.