कचरा वेचताना स्फोट होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच शनिवारी सकाळी एटीएम मशीनमध्ये अचानक आग लागल्याचा प्रकार उस्मानपुऱ्यात घडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे लाखो रुपयांची रक्कम वाचली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली असून, सर्वच एटीएममध्ये पैसे काढण्याची लगबग वाढली आहे.
एटीएममधून मोठय़ा प्रमाणात पैसे काढण्यात येत आहेत. त्यामुळे मशीनवर मोठा लोड येत आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या एटीएममध्ये अचानक मोठा धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे खळबळ उडाली. आसपासच्या लोकांनी तातडीने अग्निशामक दलास कळविले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एटीएम मशीनला वीजपुरवठा करणाऱ्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी. आग वेळीच आटोक्यात आणल्याने लाखो रुपयांची रक्कम वाचली. उस्मानपुरा पोलिसांनी या बाबत नोंद केली.