जिल्ह्य़ातील भोकर, मुखेड व नायगाव या शहरांनजीक तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत दाम्पत्यासह पाच जण ठार झाले.
मुखेड शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर चौधरी वेअर हाऊसजवळ एस. टी. बसची मोटारसायकलला धडक बसून देविदास संग्राम पारे (वय ३२) व त्यांची पत्नी रंजना (वय २८) हे दोघे जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मुखेड-नरसी मार्गावर ही घटना घडली. बस (एमएच १४ बीटी २२८०) मुखेडहून अमरावतीकडे जात होती. पारे यांच्या मोटारसायकलला (एमएच २६ एबी ८०४) बसची समोरून धडक बसली. पोरे आपल्या पत्नीसह मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथे सासरवाडीला आले होते. कामानिमित्त ते मुखेडला जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर बसचालक जी. एच. सोनकांबळे पसार झाला. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
भोकर मार्गावर पांढरवाडी (तालुका मुदखेड) येथे सकाळी मालमोटार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन साईनाथ गोविंद नागदरवाड (वय २०) व त्याचा मित्र रंगराव नागोराव कल्याणकर (वय २२) हे दोघे जागीच ठार झाले. बारड येथील काम आटोपून मोटारसायकलवरून (एमएच २६ एएम २१९७) गावी भोसीकडे (तालुका भोकर) ते जात होते. आंध्र प्रदेशातून आंबे घेऊन नांदेडकडे भरधाव येणाऱ्या मालमोटारीने (एपी १६ टीवाय ४६९४) मोटारसायकलला धडक दिली. रंगराव कल्याणकर या युवकाचा पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हैदराबाद-नांदेड महामार्गावर नायगाव शहरानजीक खैरगाव नाल्याजवळ
आंध्रातून भुस्सा घेऊन येणाऱ्या मालमोटारीचे टायर पंक्चर झाल्याने ही मालमोटार एका वळणावर उलटली. त्याखाली दबल्याने चालक व त्याचा मित्र जबर जखमी झाले. दोघांनाही उपचारार्थ नांदेड येथील रुग्णालयात नेले जात असताना चालक रामदास वडजे वाटेतच मरण पावला. त्याचा मित्र सुभाष कर्णेकर गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.