ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तसेच चंद्रपूर व गडचिरोली वन विभागात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्य़ातील १६४ वनाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना पोलीस दलाच्या मदतीने ९ एम.एम. पिस्तूल व एसएलआर रायफल शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात देत आहे. भद्रावती फायरिंग रेंजमध्ये चंद्रपूर वन विभाग व पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. राज्यात प्रथमच वन कर्मचाऱ्यांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तसेच चंद्रपूर वन विभाग व गडचिरोलीत वन विभागात गेल्या काही दिवसांत शिकारींची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. लगतच्या आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व छत्तीसगडातील शिकाऱ्यांनी ताडोबा, तसेच चंद्रपूर व गडचिरोली वन विभागातील वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांना लक्ष्य केले आहे. गेल्याच आठवडय़ात आंध्र प्रदेशातील दहा जणांच्या शिकारी टोळीला बिबटय़ाच्या दोन कातडीसह अटक, तर काही दिवसांपूर्वी बोर्डा येथे शिकाऱ्यांनी पट्टेदार वाघांचे तुकडे करून जंगलात फेकून दिले होते. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिकाऱ्यांना पकडण्यासाठी बंदुका देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, बंदुका देण्यापूर्वी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर वन विभाग व चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने भद्रावती फायरिंग रेंज येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. चंद्रपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक एन. डी. चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत चंद्रपूर वन विभाग, ब्रह्मपुरी वन विभाग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर व कोर झोन, स्पेशल टायगर फोर्स, वन विकास महामंडळ व मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनगार्ड अशा १६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ९ एम.एम. पिस्तूल व एसएलआर रायफल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. चंद्रपूर पोलीस दलातील रायफल तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात शिकाऱ्यांचा मागोवा घेताना त्यांच्यावर बंदुकीतून फायरिंग करणे, पिस्तूल कशा प्रकारे पकडायची, ती हाताळायची कशी, तसेच रायफल व पिस्तुलांमध्ये गोळ्यांचा वापर कसा करायचा, शिकारी दिसताच त्यांच्यावर बंदूक कशा रोखाव्या, आदी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच बंदूक साफसफाई व शस्त्र हाताळणी व सरावही करवून घेतला जात आहे, तसेच या दोन दिवसीय प्रशिक्षणात भारतीय वन कायद्याची माहिती व शस्त्रगुन्हे याची माहिती ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक सुजय दोडल यांनी करून दिली, तर वन केसेस व प्रोटेक्शन अ‍ॅक्ट याची माहिती अ‍ॅड. मेघा महाजन यांनी दिली. उद्या संपूर्ण दिवस १६४ वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना जंगलात काम करताना पिस्तुलातून फायरिंग कशी करायची, याचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक सुजय दोडल यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.