शेतातील उभ्या पिकांची वन्यप्राणी नासधूस करतात म्हणून पिकांच्या सुरक्षेसाठी थांबलेल्या शेतकरी कुटुंबावर शनिवारी मध्यरात्री एका वन्यप्राण्याने हल्ला करून चार जणांना जखमी केले. हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता होता, हे जखमींना सांगता न आल्याने त्या प्राण्याविषयी गूढ वाढले आहे.

तालुक्यातील पोही गावापासून चार किलोमीटरवर मोरे व कोते कुटुंबीय परिसरातील वन्यप्राणी व हरणांचे कळप पिकांची नासधूस करतात म्हणून शेतात छोटीशी झोपडी बांधून राहतात. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संजय ओंकार मोरे (४५), श्रावण गजरू मोरे (६५) हे झोपडीबाहेर झोपले असताना एका वन्यप्राण्याने श्रावण मोरे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यामुळे ते ओरडू लागताच संजयने लाकडी दंडुक्याने त्या प्राण्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यात संजयही जखमी झाला. त्यांनी मोठे दगड फेकून त्या प्राण्याला हुसकावले.

जखमी संजय मोरे व श्रावण मोरे यांनी मग भेदरलेल्या अवस्थेत झोपडीला खाट आडवी लावली. दरम्यान, त्यानंतर जवळच असलेल्या दुसऱ्या झोपडीजवळ त्या प्राण्याने आपला मोर्चा वळविला. झोपेत असलेल्या ललिता रामचंद्र कोते (२५) व त्यांचा छोटा एक वर्षांचा दादू यांच्यावर त्या वन्यप्राण्याने हल्ला केला. ललिताने मुलाला पोटाशी धरत सासरे रघुनाथ सखाराम कोते (७०) यांच्याकडे धाव घेतली.

त्या वन्यप्राण्याशी रघुनाथ कोते यांनी झुंज देण्यास सुरुवात केली. बराच वेळ चाललेल्या या झटापटीत कोते गंभीर जखमी झाले. त्या प्राण्याला हाकलल्यानंतरही तो थोडा वेळ थांबून वारंवार हल्ला करत होता. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्यांची झुंज सुरूच होती. त्यानंतर तो प्राणी निघून गेला; परंतु तो प्राणी परत येईल या भीतीपोटी हे कुटुंबीय रात्रभर जागेच राहिले. रविवारी दिवस उजाडताच श्रावण मोरे यांनी पोलीस पाटील संजय राठोड यांचे घर गाठून रात्री झालेल्या वन्यप्राण्याच्या हल्लय़ाबाबत माहिती दिली. राठोड यांनी पोलीस व वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देत तातडीने जखमींना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मध्यरात्री हल्ला झाल्याने प्राणी नेमका कोणता होता, याविषयी जखमींना माहिती देता आली नाही. वनक्षेत्रपाल विक्रम आहिरे यांनी हल्ला करणारा प्राणी पिसाळलेला जंगली कुत्रा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.