कराड नगरपालिकेत विरोधी आघाडीत सावळागोंधळ सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते महादेव पवार यांना अंधारात ठेवून उर्वरित आठ सदस्यांनी स्मिता हुलवान यांना विरोधी पक्षनेत्या म्हणून संमती दिली आहे. हुलवान यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त करून त्यांची ही निवड बेकायदा असल्याने कायदेशीर मार्गाने निवडीचा मार्ग चोखाळावा अशी भूमिका महादेव पवार यांनी पत्रकार बैठकीत केली.
नोंदणीकृत असलेल्या कृष्णा विकास आघाडीचे डॉ. सुरेश भोसले हे अध्यक्ष आहेत. माझी निवड आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत तसेच, संबंधितांना लेखी पत्र देऊन करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या युवानेते अतुल भोसले यांचे खच्चीकरण सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून माझ्यावर अन्याय करण्यात येत आहे. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चर्चेअंती नेतेपदावर निर्णय व्हायला हवा होता. मात्र, तसे न करता परस्पर निर्णय घेणे साहजिकच बेकायदेशीर आहे. ते ७ सदस्य आघाडीच मानत नसल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसून येते, अशी टीका त्यांनी केली. आपण विरोधी नेते म्हणून, कामात कुठे कमी पडलो नाही. प्रत्येकाला समजून घेऊन कामाची समान संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचा दावा पवार यांनी केला. हुलवान यांच्या निवडीविरुद्ध आपण पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले असल्याचे सांगताना, अखेपर्यंत अतुल भोसले यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, स्मिता हुलवान यांच्या निवडीवर सर्व सातही सदस्य ठाम असल्याचे बोलले जात असून, विरोधी आघाडीचे नेते आमदार आनंदराव पाटील यांनी हुलवान यांचा सत्कार करून त्यांच्या निवडीला भक्कम पाठबळ दिले आहे. मात्र, विरोधी आघाडीत माजी नगराध्यक्षा शारदा जाधव या सर्वात ज्येष्ठ सदस्या असताना, हुलवान यांचीच निवड का याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.