एकात्मिक बाल विकास विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे ग्रामीण भागात केलेल्या तपासणीत सुमारे ४३ टक्के किशोरवयीन मुलींत तसेच ५४ टक्के गर्भवती महिलांमधील रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. किशोरवयीन मुली व गर्भवती महिलांची ही टक्केवारी चिंताजनक आहे.
महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात शाश्वत कुपोषणमुक्तीसाठी १ हजार दिवसांच्या पंचसूत्रीचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यानुसार किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या सूचनेनुसार तपासणीचा कार्यक्रम ८ ते २५ मार्च दरम्यान जिल्हाभर राबवला गेला. त्याचे अहवाल आता संकलित झाले आहेत. सुमारे ९० टक्के मुली व गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार हे प्रमाण आहे.
आजची मुलगी ही उद्याची माता असते, कुपोषणमुक्तीसाठी तिला शारीरिकदृष्टय़ा सक्षम बनवले तरच कुपोषणमुक्त बालके जन्माला येतील, योग्य आहाराचा अभाव, आरोग्याची काळजी न घेणे, रक्तात लोहाची कमतरता याचा परिणाम प्रजननावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येणे, कमी दिवसांत बाळाचा जन्म होणे व त्यातून बालके कुपोषित होणे याचे प्रमाण वाढते, यासाठी ही तपासणी करण्यात आल्याचे विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी सांगितले.
जिल्हय़ात १५ ते २५ वयोगटांतील मुलींची संख्या १ लाख ४९ हजार ९६४ आहे, त्यातील १ लाख १७ हजार ४ मुलींमधील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीतकमी ११ टक्के हवे असते. ४६४ मुलींमध्ये हे प्रमाण ७ टक्क्यांपेक्षा कमी तर ७८ हजार ५७१ मुलींमध्ये हे प्रमाण ७ ते ११ टक्क्यांपर्यंत आढळले. ३६ हजार ९६९ मुलींमध्ये हे प्रमाण ११ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
जिल्हय़ात गरोदर मातांची संख्या २९ हजार ८७ आहे. त्यातील २५ हजार २ मातांची तपासणी करण्यात आली. त्यातील १७६ महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ७ टक्क्यांपेक्षा कमी तर १६ हजार ४७२ जणींमध्ये हे प्रमाण ७ ते ११ टक्क्यांपर्यंत आढळले. ८ हजार ६५४ जणींमध्ये हे प्रमाण ११ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तपासणीसाठी आरोग्य उपकेंद्रनिहाय आरोग्य व महिला बाल कल्याण विभागाची, ५ जणांचा समावेश असलेली पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी प्रत्येक गावातील अंगणवाडीत तपासणी केली.
५२ आठवडय़ांचे उपचार
हिमोग्लोबिनची कमतरता आढळलेल्या किशोरवयीन मुली व गरोदर मातांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाल कल्याण विभागाच्या कर्मचारी अंगणवाडीतून मुली व मातांना आहार, स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती देणार आहेत. त्याचबरोबर मुलींना ५२ आठवडे लोहयुक्त गोळय़ा व मातांना आयर्न फोलिक अ‍ॅसिडच्या गोळय़ा, दरमहा लसीकरण केले जाणार आहे.
माहेर उपक्रम
संगमनेर, अकोले, राहुरी, पारनेर, पाथर्डी या तालुक्यांत मुली व मातांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळले आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी जि.प.ने प्रायोगिक तत्त्वावर लोकसहभागातून ‘माहेर’ उपक्रम अंगणवाडय़ांतून राबवण्यास सुरुवात केली आहे. अकोले तालुक्यातील १५ अंगणवाडय़ांतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.