स्थापनेला तीन वर्षे झाले तरी अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीत गोंडवाना विद्यापीठाचा समावेश नाही. यासाठी आवश्यक प्रक्रिया विद्यापीठाने पूर्ण न केल्यास विद्यापीठाच्या पदवीधरांच्या पहिल्याच तुकडीसमोर अडचणी निर्माण होणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा प्रचंड आवका तसेच नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठ २७ सप्टेंबर २०११ मध्ये अस्तित्वात आले. या विद्यापीठाची कार्यकक्षा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ापुरती आहे. हे दोन्ही जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या भागातील तरुण-तरुणींना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे, विद्यापीठासंबंधीची कामे सुलभतेने व्हावी म्हणून विद्यापीठ स्थापन झाले. विद्यापीठाला तीन वर्षे पूर्ण झाल्याने आता लवकरच या विद्यापीठाची पदवीप्राप्त पहिली पिढी बाहेर पडेल. विविध पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांला असलेल्या काही विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना विद्यापीठ राज्य लोकसेवा आयोगाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीतच नसल्याचे आढळून आल्याने त्यांची निराशा झाली आहे. याामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला आयोगाची परीक्षा देता येणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.
राज्य सेवेतील नियुक्तीसाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठांची यादी राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील ३९ विद्यापीठांची नावे त्यात आहेत. यात विदर्भातील विश्वेशरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचा समावेश आहे.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठांर्तगत असलेल्या महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर २०११ पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रा.तु.म. नागपूर विद्यापीठाची पदवी मिळाली आहे. मात्र, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांतील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. त्यामुळे तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या शाखेतील विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठातून बाहेर पडतील.
ती तांत्रिक बाब – कुलगुरू
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित म्हणाले,ह्व विद्यापीठाची स्थापना २०११ मध्ये झाली. मात्र, विद्यापीठाचे पहिले शैक्षिणक सत्र २०१२ पासून सुरू झाले. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी पुढील वर्षी बाहेर पडेल. मात्र, विद्यापीठातून बी.एड.ची पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडले आहेत. नेट/सेटसाठी विद्यापीठ पात्र आहेत. ‘एमपीएससी’त विद्यापीठात नाव नसणे ही तांत्रिक बाब आहे. विद्यापीठ त्यासाठी एमपीएससीकडे अर्ज करेल.