अवघ्या चार तासात २८१ मि.मी.च्या वर मुसळधार पाऊस कोसळल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. गेल्या २५ वर्षांत शहरात असा पाऊस पडला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने हजारो लोक अडकून पडले आहेत. दरम्यान, जिल्ह्य़ात जोरदार पाऊस सुरूच असून भिवकुंड नाल्यावर एका ऑटोरिक्षातील सहा जण वाहून गेले. यातील चौघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले असून रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याने हजारो प्रवासी गाडय़ांमध्ये अडकून पडले आहेत. इरई धरणाचे सर्व दरवाजे आज एक मीटरने उघडण्यात आल्याने अनेक भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रविवार सुरू झालेल्या मुसळधार पावसाने काल गुरुवारी विश्रांती घेतल्यानंतर आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर १२ वाजतापासून अभूतपूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी चापर्यंत सलग कोसळतच होता.
या पावसाचा जोर इतका होता की, समोरची व्यक्तीही  स्पष्टपणे दिसत नव्हती. अवघ्या तासभराच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या महात्मा गांधी चौकापासून, तर जयंत टॉकीज या रस्त्यावर, तसेच कस्तुरबा मार्गावर ज्युबिली हायस्कुलपासून, तर कस्तुरबा गांधी चौकापर्यंत कंबरभर पाणी होते. मुख्य मार्गावरील सर्व दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. लोकमान्य टिळक विद्यालय, नोकिया शोरूम, लक्ष्मीनारायण मंदिर, श्री कलेक्शन, बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅक ऑफ इंडिया, चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालय, हॉटेल पंजाब, जयंत टॉकीज, श्री टॉकीज, आझाद बाग, आनंद संकुल पाण्याखाली आले. तेथे जवळपास ३ ते ४ फुट पाणी होते. गांधी चौक ते जयंत टॉकीजपर्यंत पाणी असल्याने स्कुलबस, चारचाकी व दुचाकी वाहने पाण्यात फसल्याने या मार्गावर वाहनांची रांग लागली होती. हीच परिस्थिती कस्तुरबा मार्गावर होती. ज्युबिली हायस्कुल, सिटी हायस्कुल, कस्तुरबा चौकात बल्लारपूरचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले. शहरातील सर्व प्रमुख नाले तुंबल्याने सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी होते. या पाण्यात शेकडो लोक अडकलेले होते. मुख्य मार्गावरील दुकानदार या अडकून पडलेल्यांना पाण्यातून रस्ता दाखवित बाहेर काढत होते.
शहरातील मुख्य गोलबाजारात कंबरभर पाणी साचल्याने कापड, फळविक्रेते, किराणा दुकानातील लाखोचा माल खराब झाला. या बाजारात जवळपास सर्वच दुकानात पाणी शिरल्याने नुकसान मोठय़ा प्रमाणात झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या बाजारात अडकलेल्या शेकडो लोकांना अशाच पध्दतीने बाहेर काढण्यात आले. जिल्हा रुग्णालय, तसेच खासगी रुग्णालयात आलेल्या महिला, बालकेही पाण्यात अडकले होते. स्कुलबसमुळे छोटी-मोठी शाळकरी मुलेही  पाण्यात अडकलेली होती. पावसाचे पाणी शाळेत शिरल्याने लोकमान्य टिकळ विद्यालय, सिटी हायस्कुल, तसेच दाताळा मार्गावरील महर्षी स्कुलला सुटी देण्यात आली. व्यापारी संकुलातील भूमिगत दुकाने तर पाण्यात पूर्णपणे बुडली होती. आईस्क्रीम पार्लर व हॉटेलात पाणी शिरल्याने यंत्रसामुग्री खराब झाली. रेडक्रॉस भवन ते जयंत टॉकीज या मार्गावरही पाणी साचले होते. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नदीकाठावरील वस्त्यांना बसला आहे. काल गुरुवारपासून पाणी उतरण्यास सुरुवात झालेली असतांनाच आज रहमतनगर, सिस्टर कॉलनी, वडगाव, स्वावलंबी नगर, नगिनाबाग, महसूल कॉलनी, ठक्कर कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, उत्पादन शुल्क विभागाची कॉलनी, तसेच नदीकाठावरील संकुलात पाणी शिरल्याने तेथील लोकांना बाहेर काढावे लागले. इरई धरणाचे सातही दरवाजे एक मिटरने उघडण्यात आल्याने या वस्त्यांमध्ये पूर परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. काल निर्माण झालेली परिस्थिती आज पुन्हा जैसे थे असल्याने लोक मनपा व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावाने अक्षरश: शिव्या हासडत आहेत.
गेल्या २५ वर्षांत इतका मुसळधार पाऊस कधीच झाला नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याने मनपाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी पावसाळ्यापूर्वी योग्य पध्दतीने कामे न झाल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याची ओरड लोक करत आहेत. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड नाल्याजवळ एक ऑटोरिक्षा सहा प्रवाशांसह वाहून गेला.
यातील चौघांना वाचविण्यात यश आले असून एका अनोळखी मुलीचा यात मृत्यू झाला. या मुलींच्या वडिलांचा शोध बल्लारपूर पोलिस घेत असल्याची माहिती ठाणेदार पंजाबराव मडावी यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

पालकमंत्र्यांचा ताफा पाण्यात अडकला
मुसळधार पावसात शहरातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत असलेले पालकमंत्री संजय देवतळे व जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर व अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा आझाद बागेजवळ पाण्यात अडकून पडला. यानंतर ही वाहने कशीबशी पाण्यातून काढण्यात आली व कस्तुरबा मार्गाने जात असतांना तेथेही अडकून पडली. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहन समोर जात नसल्याचे बघून पालकमंत्री काही वेळासाठी स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांच्या कार्यालयात बसले. पाऊस कमी झाल्यानंतर ते तेथून निघाले आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली.

रेल्वे गाडय़ा थांबवल्या
मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्ग पाण्याखाली आल्याने दिल्ली-मद्रास-हैदराबाद या मार्गावरील राजधानी एक्स्प्रेस चंद्रपूरला सलग तीन तास, जी.टी. एक्स्प्रेस वरोरा येथे दोन तास, तर त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस बाबुपेठ येथे दोन तास थांबविण्यात आली होती. वरोरा, चंद्रपूर व बल्लारपूर येथे रेल्वे मार्ग अक्षरश: पाण्याखाली आले होते. त्यामुळे मध्य रेल्वेला गाडय़ा थांबवाव्या लागल्या. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

*  ऑटोतील ६ जण वाहून गेले; चौघे बचावले, मुलीचा मृत्यू, वडील बेपत्ता
*  ठिकठिकाणी पाणी साचल्याने हजारो अडकले
*  आ. मुनगंटीवारांच्या घरातही पाणी
*  अनेक मार्ग बंद, रेल्वे गाडय़ाही रोखल्या
*  इरई धरणाचे पाण्यामुळे पुन्हा पूरस्थिती