निलंगा तालुक्यातील माचरटवाडी येथे गेल्या गुरुवारी (२६ जून) अमावास्येच्या रात्री गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी देण्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला. सर्व आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र आर्थिक तडजोडीतून प्रकरण मिटवण्यात आले. मंगळवारी गावकऱ्यांनी पुन्हा हे प्रकरण धसास लावल्यामुळे या प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर १३ जण फरारी आहेत.
माचरटवाडी गावातील अनिल कुलकर्णी निटूरकर यांची जमीन वाटय़ाने लावली होती. वाटेकऱ्याला शेतातील वडाच्या झाडाखाली काही आवाज येत असल्याचा भास होत होता. झाडाखाली गुप्तधन असल्याचा संशय त्याला आला. गुप्तधनाच्या लालसेपोटी बाहेरगावाहून अनेक चारचाकी वाहनांतून सुमारे सोळा जण गुरुवारी (२६ जून) रात्री माचरटवाडी गावात आले. त्यांनी सोबत लहान मुलगा व मुलीस आणले होते. दोन महिलाही होत्या. नरबळीच्या विधीसाठी पूजेचे साहित्य खरेदी करण्यास काही जण गावात आले. दरम्यान, अचानक अनोळखी व्यक्ती गावात आल्यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावला व त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस जमादार आर. एस. गुळभेले यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे आला. पूजेचे साहित्य व सर्व १६ जणांना घेऊन पोलीस निघून गेले.
गावकऱ्यांना या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होईल, असे वाटले होते, मात्र आर्थिक तडजोडीतून प्रकरण मिटवण्यात आले. याचा सुगावा लागताच मंगळवारी गावकऱ्यांनी पुन्हा शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर मात्र १६ पकी तिघा संशयितांना ताब्यात घेतले, इतर १३ जण फरारी आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची सत्यासत्यता तपासून पाहिली जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.