कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी उस्मानाबादमध्ये शुक्रवारी मराठा समाज रस्त्यावर उतरला. विविध मागण्यांसाठी शहरातील जिजाऊ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेन हा मूकमोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या या मोर्चात डॉक्टर आणि शिक्षकांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी  सहभाग घेतला. ५ लाखाहून अधिक लोकं उस्मानाबादच्या मोर्चात सहभागी झाले आहेत. मराठा समाजाने पुकारलेल्या या आंदोलनाने उस्मानाबाद शहराने भगवे रुप धारण केल्याचे चित्र दिसत आहे. हातात भगवे झेंडे घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले. तरुणाईने देखील घोषणाबाजी न करता कोपर्डीप्रकरणाचा शांततेत  निषेध नोंदविला. आरोपींच्या फाशीच्या मागणीसोबतच अॅट्रोसिटी  कायदा शीथिल करण्याबाबत  फेरविचार करण्याचीही  मागणी देखील यावेळी करण्यात आली. मोर्चातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून उस्मानाबादमध्ये ८०० पोलिसांसह केंद्रीय पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सोशल माध्यमांच्या साहय्याने ही मोर्चेबांधणी सुरू होती. १३  जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलीवर  तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे अटकेत आहेत.