देवी महाकालीच्या यात्रेला येथे सुरुवात झाली असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील हजारो भक्त यात्रेत सहभागी झाले आहेत. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंड राजे वीरेंद्रशहा राजे चंद्रशहा आत्राम यांच्या समाधी वॉर्डातील वाडय़ातून वाजतगाजत मिरवणूक निघाली. राजांनी देवीची पूजा केल्यानंतर यात्रेकरूंसाठी मंदिराची सर्व दरवाजे उघडण्यात आली आहेत.
विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी आराध्य दैवत देवी महाकालीचे देवस्थान एक महत्वाचे शक्तीपीठ आहे. मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीच्या यात्रेला चैत्र महिन्यात शनिवार ५ एप्रिलपासून सुरुवात झाली. दरवर्षी चैत्र पोर्णिमेला ही यात्रा भरत असली तरी देवीची नवरात्र उत्साहात साजरी केली जाते. नवरात्रीत भक्त मंडळी नग्न पावलाने रस्त्याने लोटांगण घालत देवीच्या मंदिरात दाखल होतात. यावर्षी कडक उन्हाळ्यात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे दाखल झाले आहेत. यात विदर्भ, मराठवाडय़ासह सोलापूर, कोल्हापूर, धुळे, आंध्रपदेशातील भाविकांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे. भक्तांची प्रचंड गर्दी झाली असल्याने मंदिर परिसरातच भक्त निवासात भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. मनपाने व मंदिर व्यवस्थापनाकडून भक्तांच्या राहण्यासोबतच पिण्याचे पाणी, आंघोळ, शौचालय, सार्वजनिक रुग्णालय आदीची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त मंदिराला लागून असलेल्या पटांगणावर १८ हजार चौरस फूट, तर बैल बाजारात १० हजार चौरस फूट मंडप उभारण्यात आला आहे. देवीचे दर्शन घेणे भाविकांना सहज सोपे व्हावे म्हणून भक्तगणांच्या रांगेसाठी १८ हजार चौरस फुटाचा एक आणि दुसरा पाच हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठिकठिकाणी कॅमेरे व ध्वनिक्षेपक बसवण्यात आले आहे. पोलिस दलातर्फे एका पोलिस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मंदिर परिसतील ५ हजार लिटर क्षमता असलेल्या टाकीत महापालिकेकडून पाणी घेण्यात येत आहे. या पाण्याला थंड करून भाविकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, तसेच परिसरात पाणपोईची व्यवस्था आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी खास बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. या सर्व बसेसची व्यवस्था न्यू. इंग्लिश हायस्कुलच्या क्रीडांगणवर केली आहे. यासोबतच भक्तगणांसाठी मंदिर परिसरात व शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था सुध्दा केली जाते. स्वयंसेवी संस्था, तसेच विविध मंडळे सुध्दा नवरात्री उत्सवात भोजनदानात सहभागी झाले आहेत. येथील ऐतिहासिक जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट येथे नारळ फोडून देवी महाकालीच्या नावाचा गजर करीत भाविक मंदिराकडे रवाना झाले. शनिवारी पहाटे देवीची पूजा करण्यात आली. यावेळी देवीला अलंकारही परिधान करण्यात आले. सलग महिनाभर चालणाऱ्या यात्रेत शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत.