शहराला पाणीपुरवठा करण्याचा आतबट्टय़ाचा व्यवहार परवडत नसल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लातूर महानगरपालिकेने १ मार्चपासून पाणीपुरवठय़ाचे काम हाती घ्यावे, असे लेखी पत्र दिल्यामुळे पाणी वितरणाची जबाबदारी पुन्हा मनपाकडे आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ३१ डिसेंबर २०१४पासून मनपाने पाणीपुरवठय़ाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, असे पत्र दिले होते. मात्र मनपाने दोन महिन्यांची मुदत मागून घेतली होती. १ मार्च रोजी ही मुदत संपणार असल्यामुळे पुन्हा पत्र देण्यात आले आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेत जूनपर्यंत पाणीपुरवठा जीवन प्राधिकरणाने करावा, असा ठराव करून विनंती केली होती. मात्र जीवन प्राधिकरणाने हे काम आपल्याला करण्याचे शक्य नसल्याचे कळवले आहे. जीवन प्राधिकरणच्या सचिवांनीच मनापाला तसे लेखी पत्र दिले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहरातील पाणी वितरण व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नीट करत नसल्याचा दावा मनपातील सत्ताधारी मंडळी करत होती. त्या वेळी त्यांना नाकाने कांदे सोलणे सोपे होते, असा आरोप होत आहे. पुन्हा संपूर्ण जबाबदारी मनपाला घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे आता धनेगाव धरणात पाणीच नाही, त्यामुळे मनपा लातूरकरांना पाणी कसे पाजणार, असा प्रश्न विचारला जात आहे.