राज्य वन्यजीव मंडळाने जगप्रसिध्द लोणार सरोवरास आंतरराष्ट्रीय पाणथळ स्थळ म्हणून घोषित केल्यानंतरही केंद्र शासनाने अद्यापही त्यास संकेतस्थळावर अधिकृत मान्यता दिली नाही. त्यामुळे अजूनही लोणार सरोवर आंतरराष्ट्रीय पाणथळ स्थळ म्हणून घोषित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या जागतिक वारसा केंद्राची उपेक्षा आणखी किती काळ चालणार, असा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.  
महाराष्ट्र शासनाने जून २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम, वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत लोणार सरोवर, जायकवाडी, नांदूर-मधमेश्वर या परिसरांना आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित केले होते. राज्य शासनाने असा प्रस्ताव केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण तसेच पर्यटन मंत्रालयाकडे पाठविला होता. केंद्र शासन आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर अधिकृत यादीत ते नाव समाविष्ट करीत रामसर वेबसाईटच्या संकेतस्थळावर टाकत असते.
मात्र, ९ महिने उलटल्यानंतरही लोणार सरोवराचे नाव रामसरच्या संकेतस्थळावर अधिकृत यादीत नाही.
जलपरिसंस्थान व भूपरिसंस्थान यांचे गुणधर्म असलेल्या स्थळास जागतिक पाणथळाचा दर्जा देण्यात येतो. असा दर्जा दिल्यानंतर या स्थळाच्या पर्यटकीय व अन्य विकासास प्राधान्य देण्यात येते. लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य मानले जाते. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जलविज्ञान, रसायनशास्त्र याचा हे सरोवर उत्कृष्ट नमुना आहे. मात्र, सरोवराच्या जतन व विकासाकडे केंद्र व राज्य सरकारकडून उपेक्षा करण्यात येत आहे. केंद्र शासनाने लोणारला जाागतिक वारसा व आंतरराष्ट्रीय पाणथळ केंद्र घोषित करून रामसरच्या संकेतस्थळावरून हे नाव घोषित करावे, अशी मागणी आहे.

‘लोणार सरोवराची उपेक्षा नको’
लोणार सरोवराला जागतिक वारसा व आंतरराष्ट्रीय पाणथळ स्थळ घोषित करावे, राज्य वन्यजीव मंडळाने पाणथळ म्हणून घोषित केल्यानंतर रामसर संकेतस्थळावर हे नाव कसे समाविष्ट झाले नाही, याबद्दल लोणार सरोवराचे अभ्यासक प्रा. सुधाकर बुगदाने यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.