एकीकडे जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनाचे तीनतेरा वाजत असताना दुसरीकडे सरोवर अभयारण्य परिसरातील अनेक मध्ययुगीन व हेमाडपंथीय मंदिररुपी धार्मिक व मौल्यवान ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यातील अनेक मंदिरे धराशायी होत असून, काहींची मोठय़ा प्रमाणावर पडझड सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारचा पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन व नगर प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाणारे लोणार सरोवर हे विज्ञानाचे आधुनिक ज्ञानतीर्थ आहे. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जलविज्ञान व अन्य शास्त्रांच्या अभ्यासाचे हे ज्ञानतीर्थ शासकीय उपेक्षा व अनास्थेच्या चक्रव्यूहात सापडले आहे. सरोवर अभयारण्याच्या परिसरात प्रामुख्याने मध्ययुगीन व हेमाडपंथी मंदिराचा समावेश आहे. रामगया मंदिर, विष्णू मंदिर, शंकर गणपती मंदिर, वाघ महादेव मंदिर, अंबरखाना मंदिर, मुंगळ्या मंदिर, देशमुख मंदिर (वायुतीर्थ), चोपडा मंदिर (सोमतीर्थ), वेदभाभा मंदिर (यज्ञवेश्वर मंदिर), कुमारेश्वर मंदिर, वारदेश्वर मंदिर, हाकेश्वर मंदिर अशा मंदिरांचा यात समावेश आहे. शहर परिसरात दैत्यसुदन मंदिर, ब्रम्हा विष्णू महेश मंदिर, लिंबी बारव मंदिर व अन्नछत्र मंदिर हा पौराणिक मौल्यवान ठेवा आहे. ही मंदिरे पौराणिक व मध्ययुगीन शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना आहेत.

सरोवराच्या विकासासाठी शासनाने कोटय़वधी रुपये खर्च केला. मात्र, त्यातून या सरोवराचे संवर्धन झालेले नाही. वनविभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अन्य विकास अंमलबजावणी यंत्रणांनी थातूरमातूर कामे करून या सरोवर विकासाचे तीनतेरा वाजविले. ही हेमाडपंथी मंदिरे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. लोणारचा हा पौराणिक, ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शासनाने एक कृती विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी आहे. लोणार सरोवर, अभयारण्य परिसर व पौराणिक हेमाडपंथी मंदिरे यांची पर्यटकीय गुंफण घालून लोणार हे विदर्भ-मराठवाडय़ातील  वैज्ञानिक व धार्मिक पर्यटन केंद्र करण्याचा सूर राज्य सरकारला सापडला नसल्याचे मत पर्यटकीय अभ्यासकांनी व्यक्त केले.