दुष्काळी बैठकीसाठी जालना येथे आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी पत्रकार बैठकीनंतर थेट राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या निवासस्थानी पोहोचले. थोडय़ा वेळानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे याही तेथे पोहोचल्या. भाजपविरुद्ध निवडणूक लढवून विजयी झालेले टोपे यांच्या निवासस्थानी खडसे आणि मुंडे भोजनासाठी जाणार याची पुसटशी कल्पनाही तोपर्यंत भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही बाब धक्कादायकच होती. कोणत्याही राजकीय चर्चेचा टोपे यांनी इन्कार केला.
 दुपारी दोनच्या सुमारास खडसे हे टोपे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर दहा मिनिटांनी पंकजा मुंडे यांची गाडी आली. भाजपचे जिल्हय़ातील तिन्हीही आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षही खडसे यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीचे जिल्हय़ातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 राजेश टोपे यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’स सांगितले, की खडसे आणि मुंडे आपल्या घरी येण्यामागे दुरान्वयानेही राजकीय संबंध नाही. खडसे आणि आपण मागील १५ वर्षांपासून विधानसभा सभागृहात आहोत. आपण मंत्री असतानाही त्यांच्याकडे गेलो होतो. जालना येथे येणार म्हणून दुपारच्या वेळी भोजनासाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारले. ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनीही निमंत्रणावरून आपल्या निवासस्थानी भेट दिली. भोजनाच्या निमित्ताने झालेली ही भेट निव्वळ वैयक्तिक स्वरूपाची असल्याने त्या अनुषंगाने कोणतेही राजकीय संदर्भ जोडणे योग्य ठरणार नाही. राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका सर्वानाच माहीत असल्याने त्याबाबत अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असेही टोपे म्हणाले.
 संपूर्ण जालना जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, कृषी व घरगुती वीजजोडणी कोणत्याही कारणामुळे तोडू नये, टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, जिल्हय़ात गोदावरीवर असलेल्या बंधाऱ्यांसाठी जायकवाडीतून पाणी सोडावे, बेसुमार वाळूउपसा थांबवावा, ग्रामीण रोजगार हमीची कामे आवश्यक तेथे काढून वेतन वेळेवर देण्याचे नियोजन करावे, जालना शहरासाठी असलेल्या जायकवाडी योजनेतून अंबड नगरपालिका क्षेत्रास पाणी देण्याचा निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांची कर्जे संपूर्ण माफ करावीत इत्यादी मागण्यांचे निवेदन या वेळी टोपे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खडसे यांना देण्यात आले.