कोल्हापूरच्या कागल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सातजणांचा मृत्यू झाला. येथील बस्तवडे परिसरात काल रात्री कामगारांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅक्स खाणीत कोसळली. बस्तवडे हे गाव निपाणीपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. या परिसरातील कामगार रोज खासगी ट्रॅक्स करून कागल एमआयडीसीत कामासाठी येतात. दुपारी ४ ते रात्री १२ या पाळीत हे कामगार काम करायचे. काल रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून हे कामगार ट्रॅक्सने घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी ट्रॅक्समध्ये १८ कामगार होते.

कागल खाणीजवळ आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा अचानक सुटला आणि ट्रॅक्स खाणीत कोसळली. यामध्ये सात कामगारांचा मृत्यू झाला तर अकरा कामगारांना वाचविण्यात यश आले. मृतांमध्ये किशोर केरबा कुंभार, विनायक विलास चोपडे आणि उदय रघुनाथ चौगुले, संदीप सदाशिव लुल्ले, बाबूराव कापडे, आकाश ढोले आणि शहाजी तानाजी जाधव यांचा समावेश आहे. हे सर्वजण हमिदवाडा आणि हळदी येथील रहिवाशी होते. सर्व कामगार २० ते २७ वयोगटातील आहेत. त्यांच्या जाण्यामुळे सातही कामगारांची कुटूंबे उघड्यावर आली आहेत. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार चालकाला डूलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात मदत केली.