महापालिकेतील सत्तेतून काँग्रेसला खाली खेचण्यात माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांच्या तिसऱ्या आघाडीला मित्र पक्षांच्या सहाय्याने यश आले असून, या आघाडीचे हाजी मोहंमद इब्राहिम मोहंमद यासीन यांची महापौरपदी तर, शहर विकास आघाडीचे मोहंमद युनूस इसा यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसच्या एका महिला सदस्याला उच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने पालिका राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली. तिसऱ्या आघाडीच्या बंडखोर गटाने काँग्रेसला साथ देण्याचा आधीचा निर्णय बदलून अखेरच्या क्षणी पुन्हा आघाडीत सामील होण्याची भूमिका घेतल्याने तिसरी आघाडी-मित्र पक्षांना काँग्रेसवर मात करणे सहजशक्य झाले. नाशिकच्या अप्पर आयुक्त सोनाली पोंक्षे-वायनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रकिया सुरू झाली. पिठासीन अधिकाऱ्यांनी न्यायालयीन निकालानुसार काँग्रेसच्या सदस्या शेगुप्ता शेख रफीक यांना मतदानासाठी अपात्र असल्याचे जाहीर केले. महापौर पदासाठी बुलंद एकबाल (काँग्रेस आघाडी) आणि हाजी मोहंमद इब्राहीम यांच्यात निवडणूक झाली. ८० सदस्यांच्या सभागृहात बुलंद यांना ३२ तर, हाजी मोहंमद यांना ४६ मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे सुनील गायकवाड यांना ३२ तर, शहर विकास आघाडीचे युनूस इसा यांना ३४ मते मिळाली. माजी महापौर तथा एमआयएम पक्षाकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले मलिक इसा हे तटस्थ राहिले.
विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदार संघातून मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा पराभव करून काँग्रेसचे आसिफ शेख हे विजयी झाले. त्यामुळे पालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी आमदार शेख यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. काँग्रेसला धूळ चारत मौलाना- इसा गटाने विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेतला असल्याचा अर्थ त्यामुळे काढला जात आहे. विधानसभा निवडणुकीत माजी महापौर मलीक युनूस इसा यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून एमआयएमची उमेदवारी केली होती. पालिकेच्या राजकारणात त्यांचे पिता युनूस इसा यांच्यासह ते शहर विकास आघाडीत सामील आहेत. मनसेचे दोन सदस्यही या आघाडीत आहेत. ११ सदस्यांची शहर विकास आघाडी आणि मौलानांच्या तिसऱ्या आघाडीने १२ सदस्य असलेल्या शिवसेनेच्या मदतीने सत्तांतर घडवून आणण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केले होते. युनूस इसा यांची तिसरी आघाडी तसेच मित्रपक्षांचे उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाले होते. त्यामुळे शिवसेना एमआयएमला पाठिंबा देत असल्याचा अर्थ काढला जाऊन सेनेवर टीका करण्यात येऊ लागली होती. शिवसेनेप्रमाणेच मनसेचीही गोची झाल्याचे दिसत होते. परंतु महापौरपदासाठी मतदान सुरू झाल्यावर त्यावर बहिष्कार टाकत मलीक हे तटस्थ राहिले. तिसरी आघाडी-मित्रपक्ष आणि आपला काहीच संबंध नसल्याचे दाखविण्याचा त्यांनी या कृतीव्दारे प्रयत्न केला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आपले पिता युनूस इसा उमेदवार असतानाही मलीक यांनी तटस्थतेची भूमिका कायम ठेवली. दुसरीकडे महापौरपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला साथ देणाऱ्या शिवसेनेने उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून एमआयएमशी कोणताही संबंध नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.