मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या बातमीने सगळ्यांना हादरवलं होतं. लातूरमधल्या निलंग्यामध्य़े टेक ऑफ घेताना एका विजेच्या तारेला लागून हे हेलिकॉप्टर कोसळलं. त्या ठिकाणी हलकल्लोळ माजला. ते हेलिकॉप्टर पडल्यानंतरच्या पहिल्या काही क्षणांमध्ये सगळ्यांची पहिली कृती घटनास्थळापासून काही पावलं दूर पळत जाण्याची होती. पण तिथे एकच माणूस त्या पडलेल्या हेलिकॉप्टरच्या दिशेने गेला. तो म्हणजे निलंग्याचा इरफान शेख. हा अपघात जिथे घडला तिथे इरफानचं भंगाराचं दुकान आहे. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यावर सुरक्षा यंत्रणा तिथे पोचायच्या आतच इरफान हेलिकॉप्टरजवळ पोचला होता. त्याने हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांना पाहिलं. त्यांनी इरफानला काही खूण केली. त्यानंतर इरफानने हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडत मुख्यमंत्र्यांना बाहेर यायला त्यांनी मदत केली. मुख्यमंत्र्यांचा सुरक्षा ताफा तोपर्यंत आला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना तिथून दूर नेलं.

मुख्यमंत्र्यांची मदत करायला धावून जाणाऱ्या इरफानच्या प्रसंगावधानाचं आता कौतुक होतंय. जेव्हा सगळेजण अपघातस्थळापासून दूर जात होते आणि मुख्यमंत्र्यांची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा जेव्हा कार्यान्वित झालेली नव्हती तेव्हा मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी धावून जाणाऱ्या इऱफान शेखचं नाव सगळ्यांच्या तोंडी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इरफानच्या मदतीला आल्यावर त्यांनी इरफानला आपण ठीक असल्याचं सांगत त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्या इतर लोकांचीच सुटका करायला सांगितलं.

इरफानने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियाही रंजक आहेत. सगळेजण विरूध्द दिशेला पळत असताना तू त्या हेलिकॉप्टरच्या दिशेने का पळत होतास? असं विचारल्यावर “आमचा राजा आत अडकला होता” अशी प्रतिक्रिया त्याने एनडीटीव्ही इंडियाला दिली. तुला मुख्यमंत्र्यांना भेटायची इच्छा आहे का, असं विचारलं असता त्याने “आमचा राजा वाचला यातच मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया दिली”