यंदाच्या वर्षी आधीच उशिरा सुरू झालेल्या मान्सूनच्या पावसाने कोकणात पुन्हा दडी मारल्यामुळे एकूण सरासरीमध्ये लक्षणीय घट होण्याची भीती व्यक्त  केली जात आहे.
जून महिन्याचा बराचसा काळ अतिशय विस्कळीत स्वरूपात पडलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ानंतर चांगला जोर धरला. त्यामुळे जून महिनाअखेर जिल्ह्य़ाची एकूण सरासरी फक्त २९७.३ मिलीमीटर असताना जुलैअखेर १७६४.६ मिलीमीटपर्यंत त्यामध्ये वाढ झाली. त्यापाठोपाठ ऑगस्टच्या दहा दिवसांतच पावसाने जिल्ह्य़ात सरासरी दोन हजार मिलीमीटरचा टप्पाही ओलांडला. त्यामुळे पावसाची गाडी रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली होती, पण त्यानंतर अचानक पुन्हा मोठा खंड पडला असून गेल्या सुमारे दहा दिवसांत सरासरी जेमतेम १९७ मिलीमीटर पावसाची भर पडली आहे. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी दीर्घ काळ उघडीप राहात असून काही वेळा चांगले ऊनही पडत आहे. मात्र जिल्ह्य़ातील संगमेश्वर (२५६७ मिमी) आणि चिपळूण या दोन तालुक्यांमध्ये आजअखेर सुमारे अडीच हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच खेड (२३०६ मिमी), गुहागर (२२१९ मिमी), लांजा (२१९४.५ मिमी), मंडणगड (२१९३ मिमी) व दापोली (२०८० मिमी) या तालुक्यांमध्येही आजअखेर चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र या तालुक्यांची वार्षिक सरासरी लक्षात घेता हे प्रमाण कमीच आहे. राजापूर (१८२७ मिमी) आणि रत्नागिरी (१६८७ मिमी) या दोन तालुक्यांमध्ये मात्र तुलनेने कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्य़ात गेल्या पाच वर्षांत पडलेल्या सरासरी पावसाचा आढावा घेतला असता २००९ आणि २०१२ या दोन्ही वर्षी जुलैअखेर पावसाचे सरासरी प्रमाण (अनुक्रमे १८५८ मिमी व २११४ मिमी) कमीच राहिले होते. २०१० आणि २०११ या दोन्ही वर्षी मात्र याच काळात अडीच हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी जून व जुलै दोन्ही महिने जिल्ह्य़ात पावसाने धुमाकूळ घालत जुलअखेर तब्बल सरासरी ३६२७ मिलीमीटरचा विक्रम नोंदवला होता, पण नंतरच्या दोन महिन्यांत त्यामध्ये मोठी घट झाली.
रत्नागिरी जिल्ह्य़ात वार्षिक सरासरी ३३६४ मिलीमीटर पाऊस पडतो, हे लक्षात घेता यंदा हे प्रमाण गाठण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.