सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजप, छात्रभारती व आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटना यांच्यातर्फे येथील आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या विभागाच्या आयुक्तांना निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी महादेव कोळी समाज विकास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे रविवारी ही घटना घडली होती. आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परस्परविरोधी माहिती देऊन बेपत्ता असणाऱ्या विद्यार्थिनीविषयी हरविल्याची साधी तक्रारही दिली नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केले आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त शिवाजीराव सरकुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असा कोणताही प्रकारच घडला नसल्याचे सांगून दिशाभूल केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपसह छात्रभारती व आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटनेतर्फे शनिवारी या विभागाच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलने करण्यात आली. आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या खात्याचे मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. खा. हरिश्चंद्र चव्हाण, माजी महापौर प्रा. देवयानी फरांदे आदींच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. या घटनेबाबत आयुक्तांनी केलेली वक्तव्य आक्षेपार्ह असून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपने केली. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे आंदोलकांनी म्हटले आहे.          

दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेतील गंभीर जखमी तरुणीचा अखेर मृत्यू झाला. या घटनेप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी नाशिकमधील संवेदनशील नागरीक रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता शालिमार चौकातील आयएमए सभागृहापासून हुतात्मा स्मारकापर्यंत शोकमोर्चा काढणार आहेत. मोर्चानंतर हुतात्मा स्मारकात तिला श्रद्धांजली वाहण्यात येईल. शोकमोर्चात आदिवासी भागातील आधारतीर्थ शाळेतील विद्यार्थिनीही सहभागी होणार आहेत.