संततधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक तब्बल १२ तास ठप्प झाली. नागोठणे परीसराला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला. पेण तालुक्यातील पांडापुर येथे ४० घरात पाणी शिरले. तर अलिबाग तालुक्यातील ताडवागळे, परीसरात पोल्ट्रीत पाणी
शिरल्याने हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.

रायगड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. संतधार पावसामुळे डोंगर उतारावरील दगडमाती सैल होऊन खाली येण्यास सुरवात झाली. शनीवारी पहाटे १ च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत भली मोठी दरड कोसळली त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पहाटे सहाच्या सुमारास जेसीबी आणि पोखलेनच्या मशीनच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. हे काम दुपारी बाराच्या सुमारास पुर्ण झाले. त्यानंतर रस्त्यावर झालेला चिखल अग्निशमन दलाच्या मदतीने पाणी मारून हटवण्यात आला. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पेण तालुक्यातील पांडापुर येथे ४० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातील देहेन, भाकरवड, पोयनाड परीसर जलमय झाला. ओढ्यांचे पाणी घरात शिरले, ताडवागळे येथील पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. मापगाव येथे वेलावले येथील रस्ता खचला. संततधार पावसामुळे आंबा नदीने रात्री साडेतीनच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पुराचे पाणी सखल भागात शिरले. नागोठणे शहराला तीन दिवसात दुसऱ्यांना पुरपरीस्थीतीला सामोरे जावे लागले. सकाळी १० च्या सुमारास शहरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली.

रायगडात शनिवारी पडलेला पाऊस : अलिबाग १९२ मिमी, पेण २२० मिमी, मुरूड २०३ मिमी, पनवेल १०८ मिमी, उरण १७२ मिमी, कर्जत ६० मिमी, खालापूर ८१ मिमी, माणगाव ९७ मिमी, रोहा २१६ मिमी , सुधागड १६२ मिमी, तळा १०१ मिमी, महाड १०४ मिमी, पोलादपूर ८१ मिमी, म्हसळा ६८.४० मिमी, श्रीवर्धन ८० मिमी, माथेरान १४८ मिमी. एकूण – २०९३.४० मिमी, सरासरी – १३०.८४ मिमी