पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शेतकऱ्याने पत्नी, मुलगा, तसेच मोठय़ा भावाची निर्घृण हत्या केली. हत्याकांडानंतर मारेकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.
गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. प्रल्हाद लक्ष्मण तोडे (वय ४०, आंतरगाव, तालुका नायगाव) असे मारेकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान पत्नी गयाबाई (वय ३५), मुलगा हणमंत (वय ११) गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांना संपविले. नंतर मोठे बंधू अशोक लक्ष्मण तोडे (वय ५०) यांच्या शेतात प्रल्हाद गेला. तेथे अशोक व नारायण हे भाऊ जागलीवर होते. प्रल्हादने पळत जाऊन अशोकवर सपासप वार केले. या वेळी नारायणने कसाबसा जीव वाचवत पळ काढला. त्यामुळे तो बचावला. या अमानुष व निर्घृण हत्याकांडानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न करीत जवळील विषारी औषधाची बाटली घशात ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा जागे झालेल्या काहींनी त्याला पकडून ठेवले. या घटनेने गावात खळबळ उडाली. यामागे अनैतिक संबंध कारणीभूत असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येते.
माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक योगेशकुमार (भोकर), कुंटुरचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आदी फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आरोपी प्रल्हादला त्यांनी ताब्यात घेतले. या वेळी प्रल्हादने उलटय़ा केल्यामुळे विष पिल्याचा संशय बळावला. त्याला प्रथम नायगाव ग्रामीण रुग्णालयात व शुक्रवारी सकाळी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. आरोपी प्रल्हादची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.