महाकवी कालिदास नाट्यगृहातील व्यवस्थेविषयी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टवर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दामले नाट्यगृहात येण्याच्या दोन दिवस आधीच महापालिकेने दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याचे स्पष्ट केले. ही छायाचित्रे नेमकी कधीची आहेत, ते आधी तपासावे लागेल. कारण सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे कालिदास नाट्यगृहात मोठ्या स्वरुपाचे काम हाती घेता येणार नाही. दामले यांच्याकडून फेसबुकवर छायाचित्रे टाकले जाण्याच्या दोन दिवस आधीपासून महापालिकेने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. ज्या आसनांचे ‘सीट कव्हर’ फाटलेले आहेत, ते तातडीने बदलविले जात आहे. काही शौचालयांची अवस्था ठीक नव्हती. त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे कृष्णा यांनी नमूद केले. इतर दुरुस्तीची कामेही केली जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नाशिक महानगरपालिकेने उद्योजकांच्या मदतीने शहरात विविध भव्य प्रकल्पांची निर्मिती केली. १७ जानेवारी रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घडवून आणलेल्या सहलीत अनेक दिग्गज कलावंतानी नाशिक किती सुंदर आहे, इथले प्रकल्प किती छान असल्याचे प्रसारमाध्यमांना दाखले दिले.
हा कौतुक सोहळा झाल्यानंतर गुरुवारी (दि.१९) प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी याच महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या दुरावस्थचे दर्शन घडवणारी छायाचित्रे फेसबुकवर प्रदर्शित केली. याआधीही दामले यांनी कालिदास नाट्यगृहातील व्यवस्थेविषयी नाराजी नोंदविली होती.

इतर कलावंतांनी केलेला कौतुक सोहळा व दामले यांची नाराजी, यातील योगायोगाबद्दल राजकीय पातळीवरही वेगवेगळी चर्चा होत आहे. ही पोस्ट फेसबुकवर प्रदर्शित होण्याआधीच या समस्यांवर आयुक्तांनी कर्मचा-यांना पाठवून नाट्यगृहातील किरकोळ स्वरुपाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील कालिदास नाट्यगृहाच्या अवस्थेविषयी अधुनमधून नेहमी चर्चा होत असते. दामलेच नव्हे तर भरत जाधव यांना देखील या दुरवस्थेचा वाईट अनुभव नुकताच येऊन गेला.
काही दिवसांपूर्वी ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकाचा १५ जानेवारी रोजी नाट्यप्रयोग चालू असताना जाधव यांच्या पायात खिळा घुसला व त्यांच्या पायाला जखम झाली. त्यांनी याविषयी पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेतली गेल्याचे खुद्द या नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
साधारण एक वर्षापूर्वी प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या ठिकाणच्या समस्यांविषयी आयुक्त्यांशी त्यांनी चर्चा केली. यानंतर तेव्हा व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले.
कालिदास नाट्यगृहातील दुरावस्थांबद्दल महापालिका आयुक्तांशी वेळोवेळी पत्रव्यवहार होऊन या विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आले असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी सांगितले. महापालिकेच्या स्थायी समितीवर नाट्यगृहासाठी सांस्कृतिक निधी म्हणून तरतूद करण्यात यावी. नाट्यगृहातील कामांवर अंकुश ठेवण्यासाठी सांस्कृतिक समिती तयार करावी. ही वास्तू नेहमी स्वच्छ ठेवावी यासाठी आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी आयुक्त येणार म्हणून फाटलेल्या खुर्चांचे कुशन कवर शिवण्यात आले. सफाई कर्मचारी बोलवून स्वच्छता करण्यात आली. पण ही केवळ मलमपट्टी असल्याचे नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्ती बोलून दाखवत आहेत. लाईट्स व तांत्रिक बाबींशी संबंधित बाबींची पूर्तताही याठिकाणी वेळेवर होत नाही. अशा अनेक अडचणींना कलाकार व प्रेक्षक यांना सामोरे जावे लागते.
या आहेत समस्या…
याठिकाणी प्रेक्षकगृहातील बऱ्याच खुर्च्या तुटलेल्या आहेत. काही खुर्चांचे कुशन फाटलेले आहेत. स्वच्छतागृहाची दुर्दशा झालेली आहे. मेकअप रूम, ग्रीन रूम मधील लाईट्सचे होल्डर्स अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. पडदे देखील निकृष्ट दर्जाचे आहेत. कलाकारांच्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झालेली आहे. या ठिकाणी केलेले प्लम्बिंगचे काम ही निकृष्ट दर्जाचे आहे. सर्वच ठिकाणी कच-याचे साम्राज्य दिसून येते. अशा विविध समस्यांनी कालिदास नाट्यगृहाला ग्रासले आहे.

दुर्लक्ष का? नाशिककरांचा सवाल 
चिल्ड्रन टॅ्फिक पार्क, स्व. बाळासाहेब ठाकरे शस्त्रस्मारक, गोदावरीवरील पाण्याचा आकर्षक पडदा, बॉटेनिकल गार्डन, शंभर फुटी कारंजा, गोदा पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण आदी प्रकल्प उद्योजकांच्या सहाय्याने साकारणाऱ्या राज ठाकरे यांना गेल्या पाच वर्षात महाकवी कालिदास नाट्यगृहाकडे आजवर कधी लक्ष देता आले नाही का? असा प्रश्नही नाशिककरांना पडला आहे.