सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे आठही विधानसभा निवडणुकीच्या लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या.राज्याचे लक्ष लागून राहिलेली कराड दक्षिणची लढत पृथ्वीराज चव्हाण यांनी निसटत्या मतांनी जिंकली.जिल्ह्यात पाच राष्टवादी, दोन काँगेस, तर शिवसेनेने पाटणची जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेतली.
सातारा येथील जागेवर पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली मोहर उमटवली.गेल्यावेळी एक लाखावर मताधिक्याने विजयी झालेले भोसले या वेळी मात्र प्रत्येक फेरीत झुंजताना दिसले. अखेरीस ३५५०७ मतांनी ते आपले निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे दीपक पवार यांना पराभूत करुन विजयी झाले.भाजपचे दीपक पवार आणि शिवसेनेचे दगडू सपकाळ यांनी त्यांना चांगलेच झुंजवले. दीपक पवार यांना ४३६७८ मते मिळाली. त्यांच्या हक्काच्या सातारा शहराने काही प्रमाणात साथ दिल्याने त्यांना विजय दृष्टिपथात आला, तर जावळी येथे त्यांना मागे ठेवण्यात, झुंझवण्यात विरोधकांना यश आले.
कोरेगाव येथे काँग्रेसचे सर्व गट एकत्र आले तसेच शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी केलेली आंदोलने यामूळे सुरवातीला सहज वाटणारी लढत शशिकांत िशदे यांना सहज सोपी राहिली नव्हती. शेतकरी संघटनेचे उमेदवार संजय भगत तर काँग्रेसचे अ‍ॅड. विजयराव कणसे यांनी िशदे यांना झुंजवले. मात्र िशदे यांनी गेल्या पाच वर्षांत निर्माण केलेला संपर्क तसेच पालकमंत्री म्हणून मिळालेल्या कारकिर्दीचा कोरेगावच्या काही प्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्न या मुळे त्यांना विजय मिळाला. पहिल्या फेरीपासूनच ते आपल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा आघाडीवरच होते. प्रथमपासून त्यांनी ती टिकवली. आपल्या प्रतिस्पध्र्यावर अर्थात काँग्रेसचे उमेदवार विजयराव कणसे यांच्यावर त्यांनी ३१४२७ मतांनी मात केली.
वाई विधानसभेच्या जागेसाठी पारंपरिक चुरस होती.राष्टवादीचे मकरंद पाटील आणि काँगेसचे मदन भोसले यांच्यात झालेल्या लढतीत पाटील यांनी ३८४७६ मतांनी बाजी मारली आणि वर्चस्व कायम ठेवले. यावेळीही त्यांनी त्यांचा विजय लोकांनाच समíपत केला. माझ्या विकास कामांना लोकांनी भरभरुन मते दिलेली आहेत असे त्यांनी सांगितले. भोसले यांचे जवळचे कार्यकत्रे डी एम बावळेकर यांनी शिवसेनेच्या चिन्हावर िरगणात शड्ड ठोकला होता तर पुरुषोत्तम जाधव लोकसभेनंतर पुन्हा एकदा भाजपच्या चिन्हावर नशीब आजमावत होते.मात्र या चौघांमध्ये झालेल्या लढतीत जनसंपर्काच्या जोरावर मकरंद पाटील यांनी बाजी मारली. काँग्रेसचे उमेदवार मदनदादा भोसले यांना ६२२३४ मते प्राप्त झाली.
फटलण राखीव मतदार संघाच्या चौरंगी लढतीत दीपक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत राष्टवादीच्या खात्यात ही जागा कायम केली. काँग्रेसचे दीपक आगवणे तसेच शिवसेनेचे डॉ.तासगावकर यांच्यासमोर दीपक चव्हाण पहिल्यापासूनच आघाडी घेत ३३५६८ मतांनी विजयी झालेले आहेत. दीपक चव्हाण यांना ९२९१० तर काँग्रेसचे दीपक आगवणे यांना ५९३४२ मते मिळाली. शिवसेनेचे डॉ.तासगांवकर यांना १५७०४ मते मिळाली. रामराजे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.प्रतिष्ठा कायम राखण्यात त्यांना यश आले.
माण-खटाव येथील मतदार संघात जिल्ह्यात सर्वाधिक चुरस होती.काँग्रेसचे जयकुमार गोरे आपली जागा कायम ठेवण्यात यश मिळवतील का असा प्रश्न होता.घरातून शेखर गोरे यांचे असणारे आव्हान, तसेच राष्टवादीच्या सदाशिव पोळ यांचा अनुभव आणि रणजितसिंह देशमुख यांचा प्रभाव यावर मात करत केलेली कामे आणि राष्टवादीच्या बंडखोर अनिल देसांईंनी राष्टवादीच्या खाल्लेल्या मतांच्या आधारावर जयकुमार गोरे विजयी झाले. गोरे यांना ७५७०७ मते प्राप्त झाली. तर शेखर गोरे यांना ५२३५७ इतकी मते पडली. सदाशिव पोळ हे तिस-या स्थानावर राहीले. येथे पंचरंगी निवडणूक झाली. मात्र इतरांचा प्रभाव काहीच पडला नाही.
पाटण येथील लढतीत कायम चुरस राहीलेली आहे. या वेळी शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी ही जागा पुन्हा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देसाई यांनी मतदारांशी संपर्क वाढवला होता. तसेच विक्रमसिंह पाटणकरांच्या ऐवजी असणारे त्यांचे चिरंजिव सत्यजितससिंह पाटणकर यांनी प्रथमच विधानसभेच्या िरगणात दंड थोपटले असले तरी अनुभवी देसाइर्ंपुढे त्यांचा निभाव लागला नाही. १ ते १५ फेरीअखेर राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर हे आघाडीवर होते, मात्र १५ ते २७ व्या फेरीअखेर शंभुराज देसाई यांनी मुसंडी मारुन १८९०० मतांनी ते विजयी झालेले आहेत. शिवसेनेची जागा त्यांनी कायम ठेवली.
कराड दक्षिणेच्या जागेकडे राज्याचे लक्ष लागले होते. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यात असणा-या मतभेदांची पाश्र्वभूमी या संघर्षांला होती.भाजपचे अतुल भोसले यांनी आपली उमेदवारी जाहीर करत या संघर्षांला धार आणली होती. मात्र, स्वच्छ चारित्र्य ,कराडसाठी केलेली गेल्या वर्षांतली कामे,गांधी घराण्याशी त्यांचे असणारे संबंध ,राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना केलेली मदत या जोरावर त्यांनी १६४०७ मतांनी विजय मिळवला.विलासराव पाटील -उंडाळकरांना सलग आठव्यांदा या मतदार संघातून विजय मिळवता आला नाही. त्यांना ६०४१३ इतकी मते पडली. तर, पृथ्वीराज चव्हाण यांना ७६८२१ इतकी मते मिळाली.
कराड उत्तरेत राष्टवादीचे बाळासाहेब पाटील यांनी २०२८० मतांनी सहज विजय मिळवला. ते पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. काँगेसचे धर्यशील कदम आणि स्वाभिमानीचे घोरपडे यांनी त्यांना निकराची लढत दिली. यामधे धर्यशील कदम यांना ५७६६३ इतकी मते पडली तर बाळासाहेब पाटील यांना ७७९४३ इतकी मते प्राप्त झाली. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे मनोज घोरपडे यांनी मात्र निकराची झुंज दिली. पी.डी.पाटील यांच्या पुण्याईबरोबर कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ बाळासाहेब पाटील यांना तारणारे ठरले.