भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तीव्र झालेले अंर्तगत संघर्ष ज्या नेत्यामुळे सहज मिटले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांचा समावेश झाल्याने बीडसह मराठवाडय़ात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्या मंत्रिमंडळातील मराठवाडय़ाच्या त्या एकमेव आहेत. गेल्या विधानसभेत मराठवाडय़ातून भाजपचे केवळ दोन आमदार होते. या वेळी ही संख्या १४ झाली. त्यामुळे अनेकांना लाल दिव्यांचे स्वप्न पडू लागले होते. मात्र, मराठवाडय़ाच्या वाटय़ाला सध्या तरी एकमेव मंत्रिपद आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये लातूर व नांदेड या दोन जिल्ह्यांत सतत लाल दिव्याची गाडी होती. १९९५नंतर बीड जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीवर लाल दिवा नव्हता, तो पंकजा मुंडे यांच्या रुपाने मिळणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदाला भरते आले आहे. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, बबनराव लोणीकर व दलित चेहरा म्हणून सुधाकर भालेराव यांची नावे चच्रेत होती. मात्र, मराठवाडय़ातून केवळ एका व्यक्तीचा समावेश झाला.
वडील गेल्यानंतर मोठय़ा धीराने पंकजा मुंडे यांनी पुन्हा संघर्षयात्रा काढली. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे बारकाईने लक्ष होते. त्यांना या यात्रेतील रोजच्या घडामोडी कळविल्या जात होत्या. यात्रेला मिळणारा पािठबा लक्षात घेता, पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान असेल असे गृहीत धरले जात होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने सन्मान होईल, अशी भावना मराठवाडय़ातील भाजप कार्यकर्त्यांत होती. गोपीनाथ मुंडे यांना ही श्रद्धांजली असल्याचे सांगताना अनेक कार्यकर्त्यांना गहिवरून आले होते.