पुण्यात फेब्रुवारीत भरणार मराठी व्यंगचित्रकार संमेलन
देशातील नामांकित व्यंगचित्रकारांबरोबर नवोदित व्यंगचित्रकारांनाही आपली कला रसिकांसमोर ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सरस्वती लायब्ररी आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन या संस्थांतर्फे १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत चौथ्या अखिल भारतीय मराठी व्यंग्यचित्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण या संमेलनाचे अध्यक्ष असून उद्योग, गृहनिर्माण आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री सचिन अहिर संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संमेलनाच्या उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस हे संमेलन समर्पित करण्यात येणार आहे.
या संमेलनात व्यंगचित्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके, पुस्तक प्रदर्शन आदि उपक्रमांबरोबरच ‘व्यंगचित्रांचे जग’ आणि ‘व्यंगचित्रे व अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसेच ‘तुमचे अर्कचित्र तुमच्या समोर’ या उपक्रमात रसिकांना व्यंगचित्रकारांच्या समोर बसून आपले अर्कचित्र काढून घ्यायची संधी मिळणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यंगचित्रकारांनी ९४२३५२३१०५ अथवा ९८८१२४२१५३ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.