मराठवाडय़ातील वाढती गुन्हेगारी, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे नवीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. गुन्हेगारांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर काढण्यासही पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून येत्या ३-४ वर्षांत पोलीस व जनतेत सुसंवाद वाढण्यास मदत होईल, अशी माहिती औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली घाडगे उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी सांगितले की, चोरी, खून, बलात्कारासारख्या गुन्ह्यांना र्निबध घालण्यासाठी, तसेच गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या व्यक्तींना लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. पारधी समाजातील किरकोळ गुन्हेगारांना मोठय़ा गुन्ह्यातील गुन्हेगार, त्यांच्या साथीदारावर पाळत ठेवण्यासाठी, तसेच त्यांना छोटा-मोठा व्यवसाय करण्यासाठी मदत करून त्यांच्या विकासासाठी मदत केली जाणार आहे. मोठय़ा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. शांतता समितीची नवीन संरचना, तसेच मोहल्ला समितीची बठक घेऊन शांतता अबाधित राखण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाडय़ात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे दररोज सरासरी ५जणांचा अपघाती मृत्यू होतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, व्यसनाधीन चालक, वाहनांमध्ये चुकीचे इंधन वापरणे, त्यात भर म्हणून रस्ते खराब असणे अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा नांगरे यांनी व्यक्त केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७००-८०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी सरकारी वा खासगी जमीन उपलब्ध होण्यास प्रयत्न सुरू आहेत. जमीन उपलब्ध झाल्यानंतर सरकारला जागेबाबत माहिती पाठविण्यात येईल. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागू शकेल.