गंगा नदी प्रदूषित होत आहे, ती नेमकी पाण्यामुळे होत आहे की, त्यामागे अन्य कारणे आहेत, याचे संशोधन करण्याचे काम नागपुरातील राष्ट्रीय अभियांत्रिकी व पर्यावरण संशोधन संस्थेला (नीरी) देण्यात आले आहे. नीरीतील संशोधक गंगा नदीच्या प्रदूषणाचे संशोधन करून आपला अहवाल दीड वर्षांत सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत व नदी विकास मंत्री उमा भारती यांनी रविभवनात निवडक पत्रकारांना दिली.
केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा मार्गावरील नीरीत रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील चर्चेनुसार नीरीचे संशोधक सर्वप्रथम गंगेच्या पाण्याची गुणवत्ता तपासतील. ती कोणत्या घटकांमुळे प्रदूषित झाली, त्याचा शोध घेतील. त्यानंतर पाण्यातील दूषित घटक काढण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील, तसेच गंगा नदी नेमकी कोणत्या ठिकाणी अधिक प्रदूषित झाली आहे, याची माहिती आपल्या अहवालात देतील. हे संशोधक आपला अहवाल दीड वर्षांत सादर करणार आहेत. त्यानंतर कामाला खऱ्या अर्थाने वेग येईल. तोपर्यंत गंगानदी शुद्धीकरणाचे काम सुरूच राहणार असल्याचेही उमा भारती यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. गंगेप्रमाणेच नागपुरातील नाग नदी आणि पिवळी नदीच्या शुद्धीकरणासाठीही प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली जाईल. गोसेखूर्द धरणात प्रदूषित पाणी जात आहे.
 या धरणातील पाणी प्रदूषित होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही उमा भारती यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्याम वर्धने, नीरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पवन लाभशेटवर, डॉ. हेमंत पुरोहित, डॉ. बिनीवाले, डॉ. प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरणाचे कौतुक
नागपूर महापालिकेद्वारे शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. उमा भारतींना या विविध उपक्रमांची माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात आली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. महापालिकेतर्फे भांडेवाडी येथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवला जात आहे. यात शुद्ध झालेले पाणी अन्य प्रकल्पाला देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागनदी व पिवळी नदी स्वच्छ करण्याचे अभियान स्वयंसेवी संस्था व व्यक्तींच्या सहकार्याने महापालिकेद्वारे राबवले जाते. हे अभियान दरवर्षी राबवणे आवश्यक असले तरी त्यासाठीच्या निधीसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी उमा भारतींना यावेळी करण्यात आली. या प्रकल्पाला नीरीचे शास्त्रज्ञ मदत करत असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेच्या या प्रकल्पांचे त्यांनी कौतुक केले.