शुक्रवारपासून सुरू झालेल्या ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये साहित्यविषयक दर्जेदार चर्चा किंवा कार्यक्रमांचा दुष्काळच जाणवत आहे. केवळ कुतूहलापोटी झालेल्या मोठय़ा गर्दीमुळे साहित्य संमेलनाला एखाद्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ात तब्बल बावीस वर्षांनी हे संमेलन भरले आहे. त्यामुळे साहित्य संमेलन हा नेमका काय प्रकार असतो, हेच न पाहिलेला मोठा नवसाक्षर वर्ग जिल्ह्य़ात आहे. या वर्गानेच साहित्य संमेलनाला सहकुटुंब गर्दी केली आहे. संमेलनाच्या परिसरात प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एखाद्या चित्रपटाच्या सेटवर असावी, तशी सजावट केली आहे. तसेच संध्याकाळी येथे अतिशय आकर्षक प्रकाशयोजना असते. ही सजावट आणि रोषणाई पाहण्यासाठीच लोकांची गर्दी उसळत आहे. अनेक जण मोबाइलवर या सजावटीची छायाचित्रे घेताना दिसतात. तर काही जण आपल्या उपस्थितीची आठवण राहावी म्हणून स्वत:चेही छायाचित्र काढून घेत आहेत. हीच गर्दी मग संमेलन परिसरातील खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सकडे वळताना दिसते.
साहित्य संमेलनाला उत्सवी स्वरूप आल्याबद्दल आक्षेप घेणे योग्य नाही, हा युक्तिवाद मान्य केला तरी संमेलन परिसरातील या जत्रेबरोबरच मुख्य मंडपातील व्यासपीठावरूनही साहित्यविषयक दर्जेदार चर्चा, परिसंवाद, कार्यक्रम होणे अपेक्षित असते. मात्र दुर्दैवाने तो हेतू या संमेलनात साध्य होऊ शकलेला नाही. साहित्य संमेलनात राजकारणी आले तर बिघडले कुठे, असा सवाल उद्घाटक शरद पवार यांनी केला. मात्र त्याचे प्रत्यंतर याच कार्यक्रमात आले. कारण उद्घाटनप्रसंगी मावळते संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या दोनच साहित्यिकांना व्यासपीठावर स्थान होते. बाकीच्या खुच्र्या सर्व राजकारण्यांनीच काबीज केल्या होत्या. त्यामुळे मधु मंगेश कर्णिक आणि उत्तम कांबळे हे दोन माजी संमेलनाध्यक्ष प्रेक्षकांमध्येच बसले होते.
कार्यक्रमाच्या आखणीनुसार शरद पवारांना त्यांचे भाषण दहा मिनिटांत आटोपते घेणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांनीच पन्नास मिनिटे भाषण केले. त्यामुळे खुद्द संमेलनाध्यक्ष कोत्तापल्ले यांना भाषणातील महत्त्वाचे मुद्दे सांगून आटोपते घ्यावे लागले.
शनिवारी सकाळपासून झालेल्या कार्यक्रमांपैकी वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि कवी अशोक नायगावकर यांच्या खुल्या गप्पा म्हणजे निव्वळ फडमारुपणा होता. त्यानंतर ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारविश्वावर आधारित परिसंवादामध्ये बहुतेक वक्ते फक्त साहेबांच्या स्मरणरंजनामध्येच रमले. त्यामध्ये आजच्या महाराष्ट्राबद्दलचे वैचारिक मंथन अजिबात नव्हते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर आदींचा सहभाग असलेल्या परिसंवादामध्ये त्यांच्या रेषा किती प्रभावी भाषा बोलतात, याची झलक रसिकांना बघायला मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरली. या संमेलनाचे मायबाप असलेल्या राजकारणी मंडळींसाठी खास ठेवण्यात आलेल्या ‘आम्ही काय वाचताते?’ या परिसंवादाला आठपैकी पालकमंत्री भास्कर जाधव, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खा. हुसेन दलवाई आणि सूर्यकांता या चारजणांनी तर दांडीच मारली.
संमेलनाचा रविवारी (१३ जानेवारी) हा अखेरचा दिवस आहे. दिवसभरातील पाच कार्यक्रमांपैकी ‘बालजल्लोष’, ‘कथाकथन’ आणि ‘कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था’ या तीन कार्यक्रमांकडूनही फारशी अपेक्षा ठेवता येत नाही. उरलेले दोन परिसंवादही ‘परदेशातील मराठीचा जागर’ आणि ‘चित्रपटसृष्टीतील मराठी साहित्य’ या विषयांवर आहेत.
राजकारण्यांपासून सुटका?
संमेलनाचा उद्घाटनाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गाजवला असला तरी समारोपप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती अनिश्चित मानली जात आहे. त्यामुळे या वेळी तरी संमेलनाध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांना मनसोक्त फटकेबाजी करता येईल, अशी अपेक्षा आहे.