महापालिका आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी शनिवारी ‘लातूर बंद’चे, तर काँग्रेसच्या मंडळींनी व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू ठेवावेत, या साठी आवाहन केले. ‘बंद’वरून काँग्रेस-विरोधक प्रथमच आमनेसामने आले.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, महाराष्ट्र विकास आघाडी, शेकाप, मनसे, बसपा आदी विरोधकांनी शनिवारी ‘बंद’चे आवाहन केले, तर काँग्रेसच्या मंडळींनी ‘बंद’ हाणून पाडण्याची व्यूहरचना केली. शहरातील विविध भागात विरोधकांनी ‘बंद’ यशस्वी करण्यासाठी कंबर कसली होती. राष्ट्रवादीचे मकरंद सावे, विनोद रणसुभे, राजेंद्र इंद्राळे, शिवसेनेचे पप्पू कुलकर्णी, भाजपाचे सुधीर धुत्तेकर, मनसेचे अभय साळुंके, महाराष्ट्र विकास आघाडीचे अॅड. अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘बंद’चे आवाहन केले जात होते.
काँग्रेसच्या वतीने महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे सभापती अॅड. समद पटेल, काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, भेलचे संचालक अॅड. त्र्यंबकदास झंवर आदी मंडळी व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवावीत, असे आवाहन करीत रस्त्यावर उतरली होती. व्यापाऱ्यांनी काँग्रेसच्या मंडळींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला, तर लागलीच विरोधकांचा जथ्था येऊन ‘बंद’चे आवाहन करीत होता.
या वादात पडण्यापेक्षा ‘बंद’च परवडला, अशी भूमिका घेऊन व्यापाऱ्यांनी ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे ठरवले. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक कडकडीत ‘बंद’ झाला. काँग्रेसच्या मंडळींना प्रथमच ‘बंद’मध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्याची वेळ आली.
मात्र, या आवाहनाला कारणे काहीही असोत, व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे ‘बंद’च्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. आयुक्तांच्या बदलीचा मुद्दा हा विरोधकांनी प्रतिष्ठेचा केला असून, त्यांनी या विषयात वातावरण तापत ठेवण्याचे ठरवले आहे.