चलन तुटवडय़ात टोमॅटोचे भाव किलोला एक ते दीड रुपयांपर्यंत गडगडले असताना गुरूवारी कांद्याचे भावही प्रति क्विंटलला २४९ रुपयांनी घसरले. मध्यंतरी सात ते आठ दिवस बाजार बंद होते. यामुळे आता कांद्याची मोठी आवक होत आहे. त्याचा परिणाम भाव गडगडण्यात होऊन नवीन लाल कांद्याला प्रति क्विंटल ९५१ रुपये भाव मिळाला. बुधवारी हाच भाव १२०० रुपये होता.

चलन तुटवडय़ामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांचे कामकाज सात ते आठ दिवस बंद राहिल्यानंतर धनादेशाच्या आधारे लिलाव पूर्ववत झाले. तथापि, व्यापारी नाशवंत भाजीपाला पडेल भावात खरेदी करत कोंडी करत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. चलन बंदी आधी आठ ते दहा रुपयांवर असणारा टोमॅटो सध्या गिरणारे बाजारात एक ते दीड रुपये किलोने खरेदी केला जात आहे. या प्रक्रियेत कांद्याचाही समावेश झाला. लासलगाव बाजारात गुरूवारी १७, ३५५ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी ९५१ रुपये भाव मिळाला. याच दिवशी बाजारात १८६० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्याला सरासरी ७५० रुपये मिळाला. आदल्या दिवशी लाल कांद्याचा सरासरी भाव १२०० रुपये होता. एकाच दिवसात नवीन कांद्याचे भाव २४९ रुपयांनी घसरले. नवीन लाल कांदा साठवता येत नाही. यामुळे नवा माल बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसतो. यामुळे कांद्याची मोठी आवक होत असून त्याचा परिणाम भाव घसरण्यात झाला.ल्याचे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.