मद्यधूंद प्रवाशाने विमान प्रवासादरम्यान एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन एअर होस्टेसने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून पोलिसांनी त्या मद्यधूंद प्रवाशाला अटक केली आहे.

जेट एअरवेजचे ९ एस २४४६० हे विमान शनिवारी मुंबईहून नागपूरला निघाले होते. या विमानात आकाश गुप्ता हा २३ वर्षाचा तरुण प्रवास करत होता. गुप्ता हा मध्यप्रदेशमधील बालाघाटचा रहिवासी असून गोव्यावरुन तो मुंबईत आला होता. मुंबईत विमानात बसण्यापूर्वी त्याने मद्यप्राशन केले होते. गुप्ता याचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. प्रवासादरम्यान गुप्ताने दोन एअर होस्टेसचा विनयभंग केला. नाश्ता देत असताना त्याने एअर होस्टेसचा हात धरला. या प्रकारानंतर दोन्ही एअर होस्टेसने घडलेल्या घटनेची माहिती केबिन क्रूला दिली. त्यांनीही गुप्ताला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधूंद अवस्थेत असलेल्या गुप्ताने त्यांच्याशीही हुज्जत घातली. शेवटी हा सर्व प्रकार विमानाचे कॅप्टन गोपालसिंह मोहनसिंह यांना सांगण्यात आला. मोहनसिंह यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला या घटनेची माहिती दिली आणि गुप्ताला त्यांच्या ताब्यात दिले.

सीआयएसएफने या प्रकरणाची सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकाश गुप्ताला अटक केली असून विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आकाशला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.