औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा क्षेत्रांत बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक अर्हता मात्र जेमतेमच असल्याचे शपथपत्रांतील नोंदीवरून दिसून येत आहे. इयत्ता दुसरी ते दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्याच बहुतेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. काही प्रमुख उमेदवारांची शैक्षणिक अर्हता मात्र लक्षणीय आहे. काँग्रेस व एमआयएमच्या उमेदवारांचे शिक्षण तुलनेने अधिक असल्याच्या नोंदी आहेत.
औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार जितेंद्र देहाडे यांनी वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. मिळविली, तर काँग्रेसचे एम. एम. शेख यांनी कृषी विषयात एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले आहे. बहुतांशी अपक्ष उमेदवारांचे शिक्षण सातवी ते दहावीपर्यंत झाले आहे. अनेकांचा कामधंदा समाजसेवा या श्रेणीत नोंदवला गेला आहे. काही उमेदवार अगदी तिसरीपर्यंतच उत्तीर्ण असल्याचे दिसून आले. यापैकी किती प्रत्यक्ष मैदानात उतरतात, हे अर्ज माघारीच्या वेळीच स्पष्ट होईल. मात्र, नामनिर्देशनपत्र सादर करणाऱ्यांमध्ये दहावी-बारावी अनुत्तीर्णतेचा भरणाच अधिक असल्याचे दिसून आले. राखीव मतदारसंघात अधिक शैक्षणिक अर्हताही दिसून येते. या मतदारसंघात एमआयएमकडून निवडणूक लढविणारे गंगाधर गाडे एम.ए.पर्यंत शिकले आहेत. शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी शिक्षण चालू असल्याचे नमूद केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी. कॉम. प्रथम वर्षांत असल्याची नोंद त्यांच्या शपथपत्रात आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या या मतदारसंघात अधिक आहे.
औरंगाबाद मध्यचे एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडे तीन पदव्या आहेत. वृत्तवाहिनीचे ते पत्रकार होते. अन्य उमेदवारांचे शिक्षण मात्र जेमतेमच असल्याच्या नोंदी आहेत. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल व भाजपचे किशनचंद तनवाणी यांचे शिक्षण नववीपर्यंत असल्याची नोंद आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद पाटील यांनी बी.कॉम. द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेतले आहे.
औरंगाबाद पूर्वमधून काँग्रेसचे राजेंद्र दर्डा यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिटिंग टेक्नॉलॉजी व ग्राफिक्सचा अभ्यासक्रम लंडनमधून पूर्ण केला. याच मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार महापौर कला ओझा यांचे शिक्षण सहावी उत्तीर्ण असल्याची नोंद शपथपत्रात आहे. भाजपचे उमेदवार अतुल सावे यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले आहे.