शिरशिंगे गोठवेवाडी व परबवाडीत शनिवारी संध्याकाळी अचानक चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे.
विद्युतलाइन तुटल्याने गाव काळोखात बुडाला आहे. घरावरचे पत्रे, नळेही उडून गेली आहेत.
शिरशिंगे गावात यापूर्वी चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्याची आजच्या चक्रीवादळाने आठवण करून दिली. या चक्रीवादळ व पावसाने लोकांत भीती निर्माण झाली आहे.
शनिवारी संध्याकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास अचानक चक्रीवादळासह पाऊस कोसळू लागला. त्यामुळे झाडे, विद्युतपोल उन्मळून पडले. घरांच्या छपरावरील पत्रे व नळेही उडून गेले. त्यामुळे सुमारे आठ ते दहा शेतकऱ्यांना फटका बसल्याचे तलाठी सचिन गोरे यांनी बोलताना सांगितले.
शिरशिंगे गोठवेवाडीतील मानाजी गावडे, सुप्रिया गावडे, रावजी गावडे, सदाशिव गावडे यांच्या घराच्या छपरावरील पत्रे, कौल उडाली आहेत. तर संतोष पेडणेकर यांच्या घरासमोर विद्युत पोल वायर लोंबकळत असल्याने त्यांचे नुकसान झाले.
शिरशिंगे परबवाडीला शरद परब यांचे चांगलेच नुकसान झाले असून भगवान परब यांच्या घरावर आंबा झाड कोसळले आहे.
गाव काळोखात सापडल्याने आणखी किती नुकसान झाले आहे त्याची आकडेवारी मिळाली नाही.
शिरशिंगेमधील गोठवेवाडी व परबवाडी पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असल्याने चक्रीवादळाचा तडाखा बसतो, पण हा पावसाळी हंगाम नसतानाही अवकाळी पाऊस व चक्रीवादळाच्या थैमानाने शेतकरी, बागायतदारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.