पावसाळ्याचे चार महिने काही मोजके अपवाद कोरडेच गेले. मात्र, पावसाळ्यात अभावानेच दमदार बरसलेल्या पावसाने अवकाळी मात्र दमदार बरसात केली. पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला. रब्बीची अपुऱ्या व कमी पावसामुळे वाट लागली. परिणामी रब्बीच्या पेरण्याही जेमतेम झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
औरंगाबादसह जालना, लातूर, हिंगोली, बीड आदी जिल्ह्य़ांत हा पाऊस बरसला. मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी या पावसाने कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावली. शनिवारी दिवसभर ढगाळी हवामान होते. त्यामुळे पावसाळ्याचे वातावरण तयार झाले होते. शुक्रवारी रात्री विस्तृत स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचा रब्बी ज्वारीला फायदा होणार आहे. खरीप हंगाम हातचा गेला. रब्बीची शाश्वती राहिली नव्हती. पिण्याच्या पाण्याची टंचाई सगळीकडे जाणवू लागली आहे. शेतीचे चित्र अनिश्चिततेत सापडले असतानाच या पावसाने दमदार आगमन केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्य़ात पाऊस
जालना – शुक्रवारी सायंकाळनंतर जिल्ह्य़ात सर्वदूर पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर कमी-अधिक प्रमाणावर पाऊस सुरू होता. शनिवारी दिवसभर जालना शहरासह जिल्ह्य़ात तुरळक पाऊस सुरू होता. जिल्हाभर ढगाळ व पावसाळी वातावरण होते. शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्य़ात सरासरी १४.८६ मिमी पाऊस झाला. पावसाची सर्वाधिक २९.५७ मिमी नोंद अंबड तालुक्यात, तर सर्वात कमी ३.७५ मिमी पाऊस मंठा तालुक्यात झाला. अन्य तालुक्यातील पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे भोकरदन १८.६२, बदनापूर १०.८०, जाफराबाद २०.१८, परतूर ७.२०, जालना २२.८७ व घनसावंगी ५.३६.
अवकाळी पावसाने झोडपले
लातूर – शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाने लातूरकरांना झोडपले. पावसाचा तुरीला फटका बसला. रब्बी पिकांनाही दिलासा मिळाला. गेल्या तीन दिवसांपासून सकाळी आकाशात ढग येत होते. मात्र, दुपारी ऊन पडत होते. शनिवारीही हेच चित्र होते. दुपारी चारच्या सुमारास पाऊस बरसला. अर्धा तास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, वाऱ्याचा वेग मोठा असल्यामुळे पाऊस जास्त काळ टिकला नाही. पावसामुळे तुरीच्या पिकाला मात्र फटका बसला. ढगाळ हवामानामुळे दोन दिवसांपासून या पिकावर कीडीचा प्रादुर्भाव झाला. शनिवारच्या पावसामुळे फुले गळल्यामुळे नुकसान झाले. पावसाअभावी रब्बीचा पेरा अल्प प्रमाणात झाला. पाऊस नसल्यामुळे पेरलेली पिके तगण्याची आशाही मावळली होती. शनिवारच्या पावसामुळे मात्र या पिकांना थोडाफार दिलासा मिळाला.
उस्मानाबाद, कळंबला मुसळधार
उस्मानाबाद – दोन दिवसांपूर्वी पडलेल्या दमदार पावसानंतर उस्मानाबाद व कळंब तालुक्यात शनिवारी पुन्हा जोरदार पाऊस बरसला. परंडा तालुक्यात सकाळपासूनच रिपरिप सुरू असून, लोहारा, भूम, उमरगा व तुळजापूर तालुक्यात हलका पाऊस झाला.
कळंब तालुक्यात दुपारी दोनपासून मुसळधार पाऊस झाला. कळंब शहर व तालुक्यात सर्वत्र हा पाऊस झाला. उस्मानाबाद शहर परिसरातही दुपारी तीनच्या सुमारास पावसाने जोरदार बरसात केली. दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ऊस आडवा पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शनिवारच्या पावसाने परंडा, कळंब व उस्मानाबाद तालुक्यात फारसे नुकसान झाले नाही. विजेच्या कडकडाटासह सर्वत्र पाऊस असल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा चांगलाच वाढला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सहा इंच बरसलेल्या पावसानंतर शनिवारीही दमदार पावसाने भर टाकल्याने शेतकरी सुखावले आहेत. पावसाने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे.