दिवाळी पाडव्यानिमित्त संस्कार भारतीच्या वतीने हजारो पणत्या व नयनरम्य रांगोळ्यांनी तुळजाभवानीचा मंदिर परिसर झळाळून निघाला. स्वच्छ भारत संकल्पना विविध रांगोळ्यांमधून साकारण्यात आली.
तुळजाभवानी देवी मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त सीमोल्लंघन पारच्यासमोर आकर्षक आकाशकंदील रांगोळ्यांमधून साकारला. गोंधळी कट्टय़ासमोर नयन मनोहर रांगोळी साकारली होती. जामदारखाना, यमाई मंदिर येथेही रांगोळ्या रेखाटल्या होत्या. परिसरात पायघडय़ा घातल्या होत्या. पाच पोते रांगोळी व एक क्विंटल रंगाचा उपयोग करून ४० कार्यकर्त्यांनी तीन तासांत या सुबक रांगोळ्या रेखाटल्या.
सायंकाळी साडेसहा वाजता कार्यकत्रे-भाविकांनी रांगोळ्यांवर पणत्या ठेवल्या. गाभाऱ्यापासून मंदिर परिसरात पणत्या लावण्यात आल्या. दिवाळीच्या पाडव्याच्या मंगलमय वातावरणात या उपक्रमामुळे मंदिर परिसर झळाळून निघाला. दिवाळीच्या सुटीमुळे मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होती.
संस्कार भारतीचे प्रदेश लोककलाप्रमुख सतीश महामुनी, तुळजापूरचे अध्यक्ष पद्माकर मोकाशे, उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, सुधीर महामुनी, लक्ष्मीकांत सुलाखे, अभिषेक जोशी, अविनाश धट, सागर माळवदकर, संदीप रोकडे, वनमाला मस्के, अश्विनी कोंडो, गीता व्यास, संगीता मोकाशे, ऋतुजा महामुनी आदी ४० कलाकारांनी यात सहभाग घेतला. ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही संकल्पना सांगणारे घोषवाक्य रांगोळ्यांत लिहिले होते. पद्माकर मोकाशे यांनी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीकांत सुलाखे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. मागील १८ वर्षांपासून अखंडित रांगोळी काढण्याचा उपक्रम संस्कार भारतीच्या वतीने राबविला जात आहे.