कोयना पाणलोट क्षेत्रात गेले १० दिवस कोसळणा-या संततधार पावसाचा जोर गेल्या २४ तासांत ओसरला आहे. या कालावधीत धरणाच्या पाणीसाठय़ात सुमारे १७ टीएमसीने तर, पाणीपातळीत ४० फुटाने वाढ झाली आहे. आज दिवसभरात धरणक्षेत्रात २२ एकूण १,६१३ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना शिवसागराचा पाणीसाठा जवळपास ३० टीएमसी म्हणजेच २८.५० टक्के आहे.
आजअखेर धरणक्षेत्रातील कोयनागर विभागात १,६७४, नवजा विभागात १,८२३ तर, महाबळेश्वर विभागात १,३४३ मि. मी पाऊस कोसळला आहे. दरम्यान, धरणाखालील पाटण व कराड तालुक्यातही पावसाची रिपरिप राहिल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळाला. तर, कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, धरणक्षेत्रासह या दोन्ही तालुक्यातील सरासरी पाऊस तुलनेत कमीच कोसळला असल्याने सलग जोमदार पावसाची गरज व्यक्त केली जात आहे.