बाहय़वळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीसाठी शुक्रवारी नगरच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्री मधुकर पिचड हे शिवसेनेचे आमदार अनिल राठोड, महापौर संग्राम जगताप यांच्यासमवेत पवार यांची भेट घेणार आहेत.
जिल्हय़ातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पिचड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्याच वेळी राठोड व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पिचड यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी महापौर जगताप, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.
बाहय़वळण रस्त्याचे काम अर्धवट व निकृष्ट असतानाच त्याचे उद्घाटन करण्यात आले, खराब रस्त्यामुळे वाहनचालक त्याचा वापर करत नाहीत, त्यामुळे जड वाहतूक शहरातून जाते. परिणामी, अपघात होऊन नागरिकांचा बळी जात आहे. आणखी किती लोकांचे बळी सरकार घेणार हे काँग्रेस आघाडी सरकारने ठरवावे, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अवजड वाहनांना शहरातून सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान जाण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला, मात्र व्यापारी गरज असेल तेव्हा वाहने आणतात, त्याऐवजी पूर्ण दिवसभर वाहनांना शहरातून जाण्यास प्रतिबंध करावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढावा, असे पिचड म्हणाले. याबाबत सहाआसनी रिक्षांना शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आरटीओ यांनी एकत्रित बैठक घेऊन कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. या वेळी कवडे यांनी शहरातील सहा प्रमुख मार्गावर एसटी महामंडळाच्या सहकार्याने शहर बस वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली. मनपाची पुढील निविदा निघेपर्यंत ही सेवा राहील, असे त्यांनी सांगितले.