मराठा व मुस्लीम आरक्षणासंबंधी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडावी. दोन्ही समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी गंगाखेड व पाथरी शहरांत कडकडीत ‘बंद’ पाळून मोर्चा काढण्यात आला. उद्या (बुधवारी) याच प्रश्नावर परभणीत विविध मराठा व मुस्लीम संघटनांचा मोर्चा निघणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा व मुस्लीम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने मराठा समाजाला १६, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के शैक्षणिक व नोकऱ्यांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उच्च न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडली गेली नाही. त्यामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाली, अशा भावना सर्वत्र पसरल्या. या पाश्र्वभूमीवर मराठा व मुस्लीम समाज आक्रमक झाला असून, जिल्ह्यात मोच्रे, बंद अशाप्रकारे आंदोलने चालू आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आदी संघटनांनी गंगाखेडला ‘बंद’ पाळून मोर्चा काढला. मोर्चात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळू मुटाळ, उपाध्यक्ष अजय भिसे, शहरप्रमुख हिरामण जाधव, छावाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोिवद मुळे आदी सहभागी झाले होते.
मराठा-मुस्लीम संघटनांनी संयुक्तपणे आरक्षणासाठी पाथरी बाजार समितीपासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात जि.प. शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, शिवसेनेचे सुरेश ढगे, रवींद्र धम्रे, काँग्रेसचे अनिल नखाते, पी. आर. िशदे, शेख शफी, मुंजाजी भाले पाटील, बापू कोल्हे, विष्णू सीताफळे आदी सहभागी झाले. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पाथरीतही व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन दुकाने बंद ठेवली.
परभणीत आज मोर्चा
आरक्षण प्रश्नावर परभणीत आरक्षण बचाव कृती समितीने उद्या (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. सकाळी १० वाजता शनिवार बाजार येथून मोर्चा निघेल. मोर्चात मराठा, मुस्लीम समाजबांधवांसह संभाजी ब्रिगेड, संभाजी सेना, मराठा महासंघ, स्वाभिमानी संघटना आदी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.