कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री थैमान घालून फार्म हाऊससह चार ठिकाणी लुटालूट केली, तसेच एका कुटुंबातील मुलीवर अत्याचार केला. या घटनांमध्ये सुमारे ३४ हजारांचा ऐवज लुटून नेण्यात आला, तर चारजण जखमी झाले. या घटनेमुळे या परिसरात दहशत असून, दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुही तालुक्यातील ससेगाव, तारनी, धानोली, सीतापूर व दीपाळा शिवारात शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ५-६ दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. तितूर मार्गावर धानोला शिवारात विजय भांडारकर यांच्या १८ एकर शेतात असलेल्या फार्महाऊसवर या टोळीने आधी हल्ला केला. शेतातील कुत्री अचानक भुंकू लागल्याने फार्महाऊसमध्ये राहणाऱ्या देवराव चाचेरकर या मजुराला जाग आली. खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना काहीजण फार्महाऊसकडे येताना दिसले. यामुळे तो पत्नी तुळसाबाई हिला सोबत घेऊन खोलीत लपला. यावेळी दरोडेखोरांनी मुख्य प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला आणि देवराव व त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केली. या दोघांना शिवीगाळ करून त्यांच्याजवळील २०० रुपये या लोकांनी हिसकावून घेतले.
दीपाळा शिवारात राहणाऱ्या पंतीराम शेंडे यांच्या घरात शिरून दरोडेखोरांनी दहशत माजवली. पंतीराम व त्यांच्या पत्नीला या लोकांनी मारहाण केली. पत्नीच्या अंगावरील ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर दागिने मिळून १८ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी हिसकावून नेला. यानंतर हे दरोडेखोर ससेगाव येथील फार्म हाऊसवर पोहोचले. या ठिकाणी त्यांनी कुटुंब प्रमुखाकडे पैशांची मागणी केली. पैसे नाहीत, असे सांगितल्यानंतर त्यांनी कुटुंबप्रमुखासह त्यांची पत्नी व मुलगा यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण करून त्यांना घरात बंद केले. त्यांनी खोलीची कडी बाहेरून लावून घेतली आणि त्यांच्या मुलीवर अत्याचार केला. दरोडेखोरांपैकी दोघांनी अत्याचार केल्याचे सांगण्यात आले. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले, मात्र पोलिसांनी तिचे वय अंदाजे १८ वर्षे असल्याचे सांगितले आहे. यानंतर त्यांनी तुंबाजी खोब्रागडे याला मारहाण केली आणि त्याच्या पत्नीच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची एकदाणी हिसकावून घेतली.