गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या लाटेने साईनगरी गारठली आहे. १५ हजार क्षमतेची साईआश्रम इमारत पूर्ण होऊनही भाविकांना या इमारतीजवळच संस्थानने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या मंडपात थंडीने कुडकुडत झोपण्याची वेळ आली आहे. परिसरात तापमान सहा ते सात अंशापर्यंत घसरले आहे.
सध्या नाताळच्या सुट्टय़ांमुळे भाविकांची शिर्डीत गर्दी वाढते आहे. शिवाय सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी देशभराच्या विविध भागांतून अनेक भक्त साईदरबारी दाखल होत आहेत. यामुळे शिर्डी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने हुडहुडी भरली आहे. संस्थानचे भक्तनिवास फूल झाल्याने भाविकांनी संस्थानने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या मंडपाचा आश्रय घेतला आहे, मात्र थंडीचा कडाका वाढल्याने या मंडपातील भाविक गारठले आहेत. या मंडपासमोरच साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या देणगीतून उभारलेला जवळपास दिडशे कोटींचा साईआश्रम भक्तनिवास प्रकल्प पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रपती या इमारतीच्या उद्घाटनसाठी येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने उद्घाटन बारगळले. हा साईआश्रम सुरु करण्यासाठी संस्थानने न्यायालयाकडे मागितलेली परवानगीही प्रलंबित आहे. याशिवाय पाण्याचा तुटवडा व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इमारत पूर्ण असूनही भाविकांना उघडय़ावर झोपण्याची वेळ आली आहे.
संस्थानचा पाचशे खेल्यांचा जुना भक्तनिवासही गर्दीने भरून गेला आहे. त्यामुळे थंडीत कुडकुडत उभे राहूनही भक्त निवासातील खोली मिळेल, याची शाश्वती भक्तांना नाही. तुम्ही इतर ठिकाणी आश्रय घ्या, असा सल्ला देण्यासही संस्थान विसरत नाही. त्यामुळे कुटूंबकबिल्यासह आलेल्या भाविकांची मोठी कुचंबना होत आहे. शिर्डीतील हॉटेलांचे दर सर्वसामान्य भक्तांना परवडण्यासारखे नसल्याने अखेरीस त्यांना संस्थानने उभारलेल्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेचा आश्रय घ्यावा लागतो. उघडय़ावर झोपलेल्या भक्तांचा एैवज, बॅगा, चोरटे रात्रीच्यावेळी हातोहात लंपास करतात.
वाढत्या गर्दीचा फायदा चोरटे घेत असून, शिर्डीत मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारांनी थैमान घातले आहे. या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. शिर्डीत आलेले भक्त केवळ साईबाबांवर श्रद्धा ठेवून वाटचाल करतात. मात्र, त्यांना गैरसोयींचाच सामना करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या काळात शिर्डी नगरपंचायतीनेही पिण्याच्या पाण्याची कपात केली आहे. त्यामुळे स्वच्छतेचीही वाट लागली आहे.
अनेक उपनगरांत दरुगधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छतागृहांचाही अभाव असल्याने सामान्य साईभक्त व महिलांची मोठय़ा प्रमाणात कुचंबना होत आहे. याकडे मात्र संस्थान प्रशासन अथवा नगरपंचायतीचा कानाडोळा आहे. वास्तविक गर्दीच्या काळात तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी करणे गरजेचे आहे.