माजी खासदार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव गिरधर पाटील यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे अनिता देशमुख व गीता पाटील या दोन मुली, नातू अभिनेता प्रतीक बब्बर असा परिवार आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडीत होत.

शिवाजीराव पाटील यांनी लहान वयातच सामाजिक कार्य सुरू केले होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी अनेकवर्षे विधानसभा, विधान परिषद व राज्यसभेचे प्रतिनिधी होते. वर्ष २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक होते. त्यांनी १२ वर्षे राज्याचे मंत्रिपद भूषवले होते.

शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता.अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहामुळे ते काँग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. शिवाजीराव पाटील यांच्यावर सोमवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता शिरपूर येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या आवारात अंत्यसंस्कार होतील.