शिर्डीतील श्रीसाईबाबा देवस्थानात ३ जानेवारी रोजी संपलेल्या १० दिवसांत दानधर्माच्या स्वरूपात १३ कोटी रुपये गोळा झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १२.५ कोटी रुपये गोळा झाले होते, असे संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणि जानेवारी महिन्याच्या पूर्वार्धात साईबाबा मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होते. गेल्या १० दिवसांत ३५ लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने भक्तांनी साईचरणी अर्पण केले आहेत. गेल्या वर्षी ३६ लाख रुपयांचे दागिने अर्पण करण्यात आले होते.
तथापि, सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे यंदा दागिने अर्पण करण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. संस्थानाला ऑनलाइन देणगीच्या स्वरूपात १० लाख रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी हे प्रमाण १.५ लाख रुपये इतके होते, असे सूत्रांनी सांगितले.