जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोध असल्याची भूमिका शनिवारीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीररीत्या मांडलेली असतानाच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले भाजप नेते व केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपचे सरकारी सकारात्मक असल्याचे सांगून या प्रकल्पाची पाठराखण केली. यामुळे शिवसेना-भाजप युतीतील दरी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ‘युती अजूनही होऊ शकते, १ डिसेंबपर्यंत थांबा,’ असेही जावडेकर यांनी या वेळी सांगितले.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर जावडेकर यांनी रविवारी येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना, आम्ही या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच (२२ नोव्हेंबर) जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध आजही आहे व यापुढेही कायम राहणार असल्याचे ठणकावून सांगितले होते. याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता भाजपचे सरकार प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र यामुळे युतीतील दरी वाढणार नसल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
चिरा उत्खननावर बंदी नाहीच – जावडेकर
घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जांभा दगडाच्या (चिरा) उत्खननावर डॉ. माधव गाडगीळ तसेच डॉ. कस्तुरीरंगन अहवालांमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र याबाबत ग्रामीण भागात असलेला संभ्रम दूर करण्यात येईल आणि पुढील आठवडय़ातच तशा प्रकारचे आदेश देण्यात येतील, असे स्पष्ट प्रतिपादन जावडेकर यांनी केले. राज्यात आणि विशेषत: कोकणामध्ये जांभा दगड हा प्रामुख्याने घरबांधणीसाठी वापरला जातो. परंतु डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. कस्तुरीरंगन अहवालांचा हवाला देऊन जांभा दगडाच्या उत्खननावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची बांधकामे ठप्प झाली होती. तर भ्रष्टाचाराचेही प्रमाण वाढले होते. याबाबत बोलताना अशा प्रकारची कोणतीही बंदी अहवालामध्ये घालण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करतानाच याबाबत ग्रामीण भागात असलेला संभ्रम केंद्र सरकारकडून दूर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच गौणखनिज बंदीबाबतही येत्या काही दिवसांत स्पष्टीकरण देणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
सध्या वाळू उत्खननासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. ती रद्द करून कडक शिक्षेसारखे उपाय अवलंबिण्यात येणार आहेत. यामुळे वाळूमाफियांचे साम्राज्य नष्ट होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र यासाठी राज्य सरकारने खंबीर भूमिका घेण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक धोरण केंद्राकडून ठरविण्यात येईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.