रायगडावर साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासनाने राष्ट्रीय सोहळा म्हणून जाहीर करावा आणि तो त्याच पद्धतीने साजरा केला जावा, अशी मागणी कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केली आहे. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे येथे आयोजित सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी भोसले यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, अशी भूमिका मांडली. दरम्यान, उपस्थित काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी ओबीसींच्या मुद्दय़ावरून छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. माणिक कोकाटे, माजी आमदार देविदास पिंगळे आदी उपस्थित होते. आरक्षणाच्या मुद्दय़ावर मराठा समाजातील वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे भोसले यांनी सांगितले. या वेळी आ. कोकाटे व ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर शरसंधान साधले. काही दिवसांपूर्वी माळी समाजाच्या मेळाव्यात भुजबळांनी ओबीसी असल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले होते. तो धागा पकडून आ. कोकाटेंनी भुजबळांवर काय अन्याय झाला, असा सवाल केला. जिल्ह्यातील मराठा समाजातील नेत्यांनी त्यांना डोक्यावर घेऊन मोठा नेता बनविले. त्यांच्या पुतण्यास खासदारकी तर मुलास आमदारकी दिली. इतके सर्व करूनही अन्यायाचे खापर ते मराठय़ांवर फोडतात, हे कितपत योग्य आहे. भुजबळांचे आणखी किती हट्ट पुरवायचे, असा सवाल आ. कोकाटे यांनी उपस्थित केला. ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनीही भुजबळांवर टीकास्त्र सोडले. भुजबळ हे स्वत:ला महात्मा फुले यांच्या विचारांचे नेते म्हणवून घेतात; परंतु त्यांनी ते विचार कधी अमलात आणले नाहीत. त्यामुळे फुले यांच्या नावाने राजकारण करणे भुजबळांनी सोडून द्यावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्या सत्रात ‘जागतिकीकरण, खासगीकरण, उद्योगीकरण, युवकांपुढील आव्हाने व आजची शिक्षणपद्धती’, दुसऱ्या सत्रात ‘माजी प्रदेशाध्यक्षांचे अनुभव आणि अपेक्षा’, ‘प्रसारमाध्यमांची सामाजिक जबाबदारी’ या विषयांवर चर्चा झाली.