सिंधुदुर्गात श्रीफळ (नारळ) दर वाढला असून इतिहासात प्रथमच नारळचा प्रति नग भाव ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पंधरा ते तीस रुपयांपर्यंत प्रति नारळ नगाला मोजावे लागत असल्याने हिंदूच्या सणासुदीला नारळाने भाविकांच्या खिशाला चांगलाच चटका लावला आहे. नारळ हमखास जेवणात वापरला जातो. त्यामुळे जेवणाची चवदेखील तिखटच बनली आहे.

सिंधुदुर्गात स्थानिक व केरळचा नारळ (श्रीफळ) विकले जाते. या नारळाचा उपयोग घरगुती जेवणापासून देवाधर्माच्या विविध सणात वापरला जातो. श्रीफळ म्हणजे अमृताचे फळ आहे. या श्रीफळामुळे देवाधर्मातील करणी व भूतही काढली जातात असा एक गोड समज आहे.

श्री गणेश चतुर्थीपासून हिंदू धर्माचे सण सुरू झाले. गुढीपाडवा, तुळशीची लग्ने, देवाचे वार्षिक जत्रौत्सव अशा विविध सण, देवधर्माच्या कार्यात श्रीफळाला मोठी मागणी व किंमत आहे.

केरळमध्ये श्रीफळ किलोवर भाव केला जातो, पण सिंधुदुर्गात या श्रीफळाचा भाग नगावर करण्यात येतो. पाणी मिळाले नसल्याने यंदा श्रीफळाचे उत्पादन कमी झाले. पाण्याअभावी श्रीफळ लहान-मोठय़ा आकारात उत्पादन आले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारळाला मागणीही वाढली, पण उत्पादनाअभावी नारळ फळ कमी झाल्याने भाव वाढला.

सिंधुदुर्गात स्थानिक श्रीफळ प्रति नग १५ रुपये, २० रुपये, २२ रुपये, २५ रुपये, २८ रुपये व सर्वात मोठे फळ ३० रुपये प्रति नग विक्रीस गेले. जीएसटीच्या काळात नारळाला इतिहासात प्रथमच ३० रुपये प्रति नग भाव मिळाला. मात्र उत्पादकांना मात्र त्याचा किती फायदा झाला, हा प्रश्न उभा राहिला आहे.

जिल्ह्य़ात नारळ बागायतींना पाणी देण्यापासून त्यांची देखभाल करेपर्यंत बागायतदारांची दमछाक होते. तसेच मजूर/कामगारांची वानवा असल्याने बागायतदार नारळ बागायतीचे वर्षांचे नियोजन करताना चिंताग्रस्त बनतात, तसेच शेकरू, माकड/वानर यांचा बागायतीला मोठा त्रास होतो. या प्राण्यांच्या तोंडातून आणि किडीच्या प्रादुर्भावातून वाचविण्यासाठी बागायतदारांना काबाडकष्ट करावे लागतात, त्यामुळे नारळ बागायतदार आर्थिकदृष्टय़ा नियोजनातून कमकुवत बनतात असे सांगण्यात येते.

जेवणाची चव नारळ वाढवितो. तसेच देवाधर्मातही त्याला स्थान असते. श्री गणेश पूजनात श्रीफळच अग्रस्थानी असते. त्यामुळे नारळाचे स्थान देवधर्म, जेवणात अग्रभागी असते. पण तोच महागला आहे.