सोलापूर महापालिकेवर अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपने मुसंडी मारून सत्ताधारी काँग्रेसचा जोरदार धक्का दिला. १०२ जागांपैकी सर्वाधिक ४९ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असताना शिवसेनेनेही २१ जागांपर्यंत मजल मारली, तर त्याच वेळी नव्यानेच आलेल्या एमआयएमने नऊ जागा जिंकून सर्वानाच धक्का दिला आहे. सत्ताधारी काँग्रेसला मतदारांनी झिडकारत केवळ १४ जागांवर थांबवले, तर त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसलाही लाथाडले. शिवसेना व एमआयएम या दोन्ही पक्षांचा फटका काँग्रेसला बसल्याचे मानले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून असलेली महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ताकद पणाला लावली होती. परंतु त्यांना मतदारांनी नाकारले. भाजपचे नेते, पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील संघर्ष उघड झाला तरी मतदारांनी पक्ष म्हणून भाजपला पसंती दिल्याचे दिसून आले.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या पानिपतात महापौर प्रा. सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी यांच्यासह अनेक दिग्गजांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, पद्माकर काळे आदींचाही समावेश आहे. तर दुसरीकडे भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की यांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. तर भाजपचे पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांच्यासह अनेक नवीन चेहरे निवडून आले आहेत. याशिवाय शिवसेनेचे महेश कोठे व त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे, पुतणे देवेंद्र कोठे यांच्यासह बहीण कुमुद अंकाराम, भाचे विनायक कोंडय़ाल व लगतचे नातेवाईक विठ्ठल कोटा असा नातलगांचा गोतावळा निवडून आला आहे.

एमआयएम पक्षाने नऊ जागांवर मुसंडी मारताना दोन्ही काँग्रेसला हादरा दिल्याचे दिसून आले. अतिसंवेदनशील समजल्या गेलेल्या नई जिंदगी, लोकमान्यनगर, मजरेवाडी भागातून राष्ट्रवादीविरुद्ध एमआयएम यांच्या संघर्षांत एमआयएमने पुरती बाजी मारली. एमआयएमचे जिल्हा प्रभारी तौफिक शेख यांच्यासह अन्य तिघे उमेदवार या प्रभागातून विजयी झाले.

  • निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ४७ उमेदवार विजयी झाले तर महापालिकेतील सत्तेचा लंबक कोणाकडे हलवायचा, याचा फैसला २० जागांवर मुसंडी मारलेल्या शिवसेनेकडे राहणार आहे.
  • काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसच्या पारडय़ात अवघ्या १४ जागा पडल्या.
  • मावळत्या पालिका सभागृहात या पक्षाचे ४२ नगरसेवक होते.
  • राष्ट्रवादी-४, एमआयएम-९, बसपा-४, माकप-१ याप्रमाणे पक्षीय बलाबल झाले आहे.