किरकोळ वादावादी, मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांचा सर्रास वापर आणि स्थानिक निवडणुकीमुळे अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मिरज तालुक्यात कळंबी येथे झालेल्या तक्रारीनंतर सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ७० टक्के मतदान झाले होते. सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या आवारात तहसील कार्यालयाच्या मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. अपवाद वगळता सर्वच ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. ९७ ग्रामपंचायतीपकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ९२ गावात आज मतदान घेण्यात आले. यासाठी तीन हजार कर्मचारी तनात करण्यात आले होते.
तालुका आणि निवडणुक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अशी आहे, मिरज २२, कवठेमहांकाळ ११, जत २९, विटा १३, आटपाडी १०, कडेगाव ९, वाळवा १, शिराळा २ अशी आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत २ लाख ३४ हजार ५९२ पकी १ लाख २६ हजार ८४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपापर्यंत ५४ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ४ वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाले होते.
स्थानिक पातळीवरील निवडणुक असल्याने मतदार आणि उमेदवारांत मोठा उत्साह दिसून येत होता. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षा, जीप यांचा वापर सर्रास होत होता. संवेदनशील गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानाच्या पूर्व संध्येला कळंबी ता. मिरज येथे घोरपडे समर्थक व मदन पाटील समर्थक गटात जोरदार संघर्ष उफाळला. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांच्यासह चौघावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.