सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. विविध एसटी कामगार संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. दिवाळीत होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून संप पुकारण्यात येत आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल विविध अफवा पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप एसटी संघटनांकडून करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी संप होणारच, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात सर्व संघटना सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे.